प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाचे युवा नेते प्रभाकर पाटील यांनी माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या ४ जानेवारी रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त एक अत्यंत स्तुत्य आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या उपक्रमाची घोषणा केली आहे. "प्रत्येक घराघरात शिक्षणाची ज्योत पेटली पाहिजे आणि आपला विद्यार्थी जागतिक स्पर्धेत टिकला पाहिजे," या ध्येयाने प्रेरित होऊन प्रभाकर पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघात 'अभ्यासाचा भोंगा' ही संकल्पना राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.या अभिनव उपक्रमाचे नियोजन केवळ शहरांपुरते मर्यादित न ठेवता मतदारसंघातील प्रत्येक दुर्गम गावापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे.माजी खासदार संजय काका पाटील यांच्या येणाऱ्या चार जानेवारीपासून सुरुवातीच्या टप्प्यात तासगाव शहर व कवठेमंकाळ शहरात या उपक्रमाची सुरुवात केली जाणार असल्याची माहिती प्रभाकर बाबा पाटील यांनी केली.यावेळी बोलताना प्रभाकर बाबा पाटील म्हणाले आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलचा अतिवापर आणि दूरदर्शनवरील मालिकांच्या आवाजामुळे विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर मोठा परिणाम होत आहे.ही गंभीर समस्या ओळखून प्रभाकर पाटील यांनी या शैक्षणिक मोहिमेची आखणी केली आहे.या उपक्रमांतर्गत दररोज संध्याकाळी तासगाव नगरपरिषद व कवठेमंकाळ नगरपरिषद येथून एक भोंगा वाजविला जाणार आहे.हा भोंगा केवळ आवाज नसून ती अभ्यासाची एक 'ललकारी' असेल. भोंगा वाजताच घरातील पालकांनी टीव्ही बंद करून आपल्या पाल्याला अभ्यासाला बसवणे, मोबाईल बाजूला ठेवणे आणि अभ्यासासाठी पोषक शांतता निर्माण करणे अपेक्षित आहे.या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना प्रभाकर पाटील यांनी नमूद केले की,राजकीय नेत्यांचा वाढदिवस हा केवळ शक्तीप्रदर्शनाचा किंवा जल्लोषाचा विषय नसून,तो समाजाच्या हितासाठी काहीतरी देण्याचा दिवस असावा. संजयकाका पाटील यांनी नेहमीच विकासाचे राजकारण केले आहे,त्याच पावलावर पाऊल ठेवत यावर्षी वाढदिवसाचे औचित्य साधून आपण मतदारसंघातील भावी पिढीला अभ्यासाची शिस्त लावण्यासाठी ही चळवळ उभी करत आहोत.त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला,पालकाला आणि सामाजिक कार्यकर्त्याला विनंती केली आहे की,या उपक्रमाकडे राजकीय दृष्टीकोनातून न पाहता एक सामाजिक जबाबदारी म्हणून पाहावे.तासगाव आणि कवठेमहांकाळ या दोन्ही शहरांसह ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींनीही या उपक्रमात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.जे गाव हा उपक्रम प्रभावीपणे राबवेल, त्या गावाची शैक्षणिक प्रगती निश्चित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.या मोहिमेमुळे पालकांमध्येही जागरूकता निर्माण होणार असून, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी हक्काची वेळ आणि वातावरण मिळणार आहे.प्रभाकर पाटील यांच्या या निर्णयाचे शैक्षणिक क्षेत्रातून आणि सर्वसामान्य जनतेतून मोठे स्वागत होत असून, 'अभ्यासाचा भोंगा' हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात एक आदर्श ठरेल, अशी चिन्हे दिसत आहेत.
चौकट.
"हा भोंगा म्हणजे केवळ एक आवाज नाही, तर तो पालकांसाठी एक आठवण आहे की आता आपल्या मुलांच्या भविष्यासाठी वेळ देण्याची गरज आहे. संध्याकाळी ७ वाजता जेव्हा गावात भोंगा वाजेल, तेव्हा घरातील टीव्ही बंद व्हावेत आणि प्रत्येकाने आपल्या मुलाला अभ्यासाच्या टेबलावर बसलेले पाहावे, अशी माझी कळकळीची इच्छा आहे. जर आपण या दोन तासांत शांतता पाळली, तर आपल्या ग्रामीण भागातील मुले देखील आयएएस, आयपीएस किंवा मोठ्या पदांवर झळकू शकतात.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या