प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून समाजासाठी काहीतरी विधायक करण्याचा आदर्श बेंद्री (ता. तासगाव) गावचे तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत प्रकाश पाटील यांनी घालून दिला आहे.त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काल, ४ जानेवारी रोजी गावामध्ये 'अभ्यासाचा भोंगा' या अभिनव उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले.सध्या राज्यामध्ये 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' मोठ्या उत्साहात सुरू आहे.बेंद्री ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या अभियानात गावचा सहभाग वाढवण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अविनाश पाटील यांनी वेळोवेळी बैठका घेतल्या.त्यांनी ग्रामस्थांना योजनेचे महत्त्व पटवून देत गावाला बक्षीस पात्र करण्यासाठी प्रोत्साहित केले.याच प्रेरणेतून आणि धावत्या युगात गावाला शिस्त व वेळेचे महत्त्व कळावे या हेतूने गावात 'अभ्यासाचा भोंगा' बसवण्याचे निश्चित करण्यात आले होते.या उपक्रमासाठी लागणारा सर्व खर्च तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच्या वाढदिवसाचे निमित्त साधून केला आहे.या भोंग्यामुळे गावातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची वेळ निश्चित होणार असून,माता-भगिनी व वृद्ध व्यक्तींना जेवणाची आणि विश्रांतीची वेळ पाळणे सोपे जाणार आहे.काल ४ जानेवारी रोजी या 'अभ्यासाच्या भोंग्याचे' विधिवत लोकार्पण करण्यात आले. वाढदिवसाचा बडेजाव न करता सार्वजनिक कामासाठी मदतीचा हात पुढे केल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे. या उपक्रमामुळे बेंद्री गावाच्या शिस्तीत आणि प्रगतीत मोलाची भर पडणार असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
"वाढदिवसानिमित्त हार-तुरे आणि फ्लेक्सवर खर्च करण्यापेक्षा आपल्या गावाला आणि पुढच्या पिढीला उपयोगी पडेल असे काहीतरी करावे, हा माझा मानस होता.मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आपल्या गावाला एक शिस्त लागावी आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला गती मिळावी,या हेतूने आम्ही 'अभ्यासाचा भोंगा' हा उपक्रम सुरू केला.या माध्यमातून जर माझ्या गावातील मुलांचे भविष्य उज्ज्वल होणार असेल,तर माझ्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित झाला आहे असे मी मानतो.
- चंद्रकांत पाटील (तंटामुक्ती अध्यक्ष, बेंद्री)
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या