प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : पिढ्यान पिढ्या द्राक्ष बागा लावून आणि बेदाणा तयार करून,तालुक्यातील शेतकरी जसा आहे तसाच राहिला,परंतु मार्केट यार्डातील बेदाणा व्यापारी व कोल्ड स्टोरेज मालक शासनाचे अनुदान घेऊन पैसे मिळवून अंगावर दोन-दोन किलो सोने घालून फिरायला लागला आहे,असा घणाघात निमणीचे शेतकरी आर. डी. पाटील यांनी केला.यावेळी त्यांनी मार्केट कमिटी संचालक आणि व्यापाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरत अफगाणिस्तानातून बेदाणा आणलेल्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि तो माल जप्त करावा अशी आक्रमक भूमिका मांडली.
येथील आर आर पाटील सभागृहात आज मार्केट कमिटी,द्राक्ष बागायतदार संघ,आणि व्यापारी असोसिएशन यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.ज्या स्टोरेजवर द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी धाडी टाकून हा सर्व प्रकार उघडकीस आणला ते स्टोरेज मालक या बैठकीला गैरहजर होते.
मार्केट कमिटीचा आदेश सदर व्यापाऱ्यांनी धुडकावून लावल्याचे दिसून आले.यावेळी सभापती युवराज पाटील व आर डी पाटील यांच्यात शाब्दिक चकमकी उडाल्या.
यावेळी द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व अनेक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या धोरणाचा निषेध करून,कडक कारवाईची मागणी केली.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे यांनी मार्केट कमिटीने यार्डात,कोल्ड स्टोरेजवर आलेला बेदाणा कुठून आलेला आहे,कोणत्या व्यापाऱ्याचा आहे याची माहिती घेणे आणि ठेवणे गरजेचे असल्याचे,तसेच शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या व्यापाऱ्यांच्या वर कारवाईची मागणी केली.व्यापारी धोरण चुकीचे असून व्यापाऱ्यांच्या अंगावरचे कपडे सुद्धा शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशाचे असल्याचा घनाघात त्यांनी केला.यावेळी व्यापारी असोसिएशनचे अशोक बाफना यांनी बेदाण्याची बाजारपेठ वाढविण्यात व्यापाऱ्यांचा सहभाग आहे, सरकारने माल आयातीवरील धोरण बदलण्याची गरज असून,संपूर्ण भारतात अफगाणिस्तानचा बेदाणा आल्याचे सांगितले.यावर सरकारने इम्पोर्ट ड्युटी वाढवली पाहिजे तरच बाहेरचा बेदाणा यायचा बंद होईल असे सांगितले.सरकारच्या धोरणापेक्षा तासगाव तालुक्यातील व सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार व बेदाणा उत्पादकांचे हित व्यापाऱ्यांनी व मार्केट कमिटीने जोपासावे असा प्रति हल्ला द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.यावेळी मार्केट कमिटीचे सभापती युवराज पाटील यांनी मार्केट कमिटीला बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी करू नये, शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम मार्केट कमिटी करत आहे मात्र मार्केट कमिटीला काही मर्यादा आहेत,आम्ही पण शेतकऱ्यांची पोरं आहोत, चुकीचं काम करणाऱ्या व्यापाऱ्यांना पाठीशी घालणार नाही, याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्यामार्फत चौकशी चालू असून, मार्केट कमिटी, द्राक्ष बागायतदार संघ आणि बेदाणा असोसिएशन, शेतकरी , शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांची संयुक्त कमिटी स्थापन करून त्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले.यावेळी शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या