प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव पोलिसांनी उत्कृष्ट तपासकौशल्याचे दर्शन घडवत खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील तब्बल दीड वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात यश मिळविले आहे. या कारवाईमुळे चर्चेतील खूनप्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला असून तासगाव पोलिसांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 559/2024 अंतर्गत दाखल असलेल्या खून प्रकरणातील आरोपी यश रमेश ढेबे (वय 23, रा. काजळ, पुणे) याला 11 जून 2026 रोजी पहाटे विशेष पथकाने अटक केली.
नेमके काय घडले होते?
12 डिसेंबर 2024 रोजी तासगाव तालुक्यातील वायफळे येथील मयत ओंकार उर्फ रोहित फाळके यांच्यावर कोयता व तलवारीसारख्या धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण खून करण्यात आला होता.या हल्ल्यात फिर्यादी संजय फाळके,त्यांची पत्नी जयश्री फाळके तसेच अशीष साठे, आदित्य साठे आणि सिकंदर शेख हे गंभीर जखमी झाले होते.या घटनेनंतर तासगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1), 109(1), 189(2), 191(2), 191(3), 190, 61(2) तसेच शस्त्र अधिनियम कलम 4, 25, 27 अन्वये गुन्हा दाखल केला होता.
आठ आरोपी आधीच जेरबंद
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी यापूर्वीच विशाल फाळके, अनिकेत खुडे,आकाश मळेकर, गणेश मळेकर, विकास उर्फ सोन्या राठोड, हर्षल चव्हाण, संदेश नायर यांच्यासह एका बालअपचारीस ताब्यात घेतले होते. मात्र यश ढेबे हा घटनेनंतर सतत फरार होता.
*तांत्रिक विश्लेषणातून लागला माग*
पोलीस अधीक्षक तुषार दोशी,अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने आरोपीचा शोध सुरू ठेवला होता.तपासादरम्यान पोलीस हवालदार अमोल चव्हाण यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीदारांच्या मदतीने आरोपीच्या वास्तव्याबाबत महत्त्वाची माहिती मिळवली.मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पळू ता. मुरबाड, जि. ठाणे परिसरात लपून राहत असल्याचे निष्पन्न झाले.
सापळा रचून केली अटक
यानंतर तासगाव पोलिसांच्या विशेष पथकाने अत्यंत गोपनीय आणि नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. अटकेनंतर त्याला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
विशेष पथकाचे योगदान
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब बदने,पोलीस हवालदार अमोल चव्हाण,अभिजित गायकर, सुहास खुबीकर,पोलीस कॉन्स्टेबल विवेक यादव,सागर पाटील यांच्यासह विशेष पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
पोलिसांच्या चिकाटीला यश
गंभीर स्वरूपाच्या या खूनप्रकरणातील फरार आरोपीला पकडण्यात आले असून आता या गुन्ह्यातील सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.दीड वर्षे सुरू असलेल्या शोधमोहीमेचा शेवट करत तासगाव पोलिसांनी दाखविलेली चिकाटी,तांत्रिक तपास आणि समन्वय यामुळे या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या