कवलापूर प्रतिनिधी : दुबई येथे आयोजित करण्यात आलेल्या CMS आयोजित भव्य ‘शिवराज्याभिषेक सोहळा दुबई २०२६’ मध्ये कवलापूर (ता. मिरज) येथील सुप्रसिद्ध संगीतकार निलेश नामदेव मोहिते यांना त्यांच्या उत्कृष्ट कलाविष्काराबद्दल सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या बहुमानामुळे कवलापूरसह संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
‘छत्रपती मराठा साम्राज्य’ (CMS), दुबई यांच्या वतीने या शिवराज्यभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाहीरसम्राट डॉ. देवानंद माळी, शाहीर कल्पनाताई माळी आणि शाहिरगंधर्व पृथ्वीराज माळी यांच्या नेतृत्वाखाली विविध पोवाडे व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. या ऐतिहासिक आणि जोशपूर्ण कार्यक्रमांना निलेश मोहिते यांनी आपल्या उत्कृष्ट संगीत संयोजनाने वेगळी उंची मिळवून दिली. त्यांच्या संगीताने दुबईतील शिवभक्तांना मंत्रमुग्ध केले.
निलेश मोहिते हे सांगली येथील तक्षशिला इंटरनॅशनल स्कूल येथे संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या आंतरराष्ट्रीय अनुभवामुळे विद्यार्थ्यांना संगीत क्षेत्रातील नवीन अभ्यासपद्धती आणि संधींचा निश्चितच लाभ होणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षक व विद्यार्थ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
याबाबत निलेश मोहिते म्हणाले, “या सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या माध्यमातून परदेशात मिळालेला सन्मान माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. शाहीरसम्राट डॉ. देवानंद माळी व परिवाराने मला अनेक टेलिव्हिजन चॅनेल वरील कार्यक्रमास आणि पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कार्यक्रमा मध्ये मला संगीत साथ करण्याची संधी दिली. तसेच संपत कदम व कृष्णांत पाटोळे यांच्या मार्गदर्शनामुळे ‘भूपाळी ते भैरवी’च्या माध्यमातून आठ राज्यांमध्ये कार्यक्रम करण्याची संधी मिळाली.”
“हा माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. दुबईतील रसिकांनी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीला दिलेले प्रेम आणि प्रतिसाद अविस्मरणीय आहे. परदेशात महाराष्ट्राची लोककला पोहोचवता आली, याचे समाधान वाटते,” असेही त्यांनी सांगितले..
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या