प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:सांगली जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड घडली असून, माजी खासदार संजयकाका पाटील यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश आता निश्चित झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे मंगळवार,दि. ३० जून रोजी हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती स्वतः संजयकाका पाटील यांनी दिली आहे.गेल्या काही महिन्यांपासून संजयकाका पाटील यांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरही त्यांच्या भाजप नेत्यांशी वाढलेल्या संपर्कामुळे त्यांच्या पुनरागमनाच्या चर्चा रंगल्या होत्या.अखेर या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले असून, काकांची भाजपमध्ये ‘घरवापसी’ निश्चित मानली जात आहे.संजयकाका पाटील यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभेची उमेदवारी मिळवली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तासगावातील जाहीर सभेनंतर त्यांनी पहिल्याच निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यानंतर २०१९ मध्येही त्यांनी विजयाची पुनरावृत्ती करत सलग दुसऱ्यांदा खासदारकी मिळवली. दहा वर्षांच्या खासदारकीच्या काळात त्यांनी अनेक विकासकामे मार्गी लावल्याचा दावा समर्थकांकडून केला जातो.मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली,परंतु तेथेही विजय हुलकावणी देऊन गेला.या पराभवानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.दरम्यान,भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिवेंद्रराजे भोसले,ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे,आमदार गोपीचंद पडळकर,सम्राट महाडिक,मकरंद देशपांडे,शेखर इनामदार तसेच बाबासाहेब पाटील आणि प्रमोद शेंडगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर भाजप प्रवेशाच्या हालचालींना वेग आला असून
आता ३० जून रोजी होणाऱ्या पक्षप्रवेशामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होणार का,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.संजयकाका पाटील यांच्या पुनरागमनामुळे भाजपची जिल्ह्यातील राजकीय ताकद वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या