प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली : प्रोग्रेसीव चेस असोसिएशन, सांगली यांच्या वतीने तक्षशीला इंटरनॅशनल स्कूल, विजयनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रोग्रेसीव खुली बुद्धिबळ स्पर्धा आणि 15 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांचे आयोजन संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत वळवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केपीज चेस अकॅडेमी आणि तक्षशीला इंटरनॅशनल स्कूल यांच्या विशेष सहकार्याने करण्यात आले होते.
स्पर्धेत महाराष्ट्र व कर्नाटकातील खेळाडूंनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या मूळच्या सांगलीकर खेळाडूनेही स्पर्धेत सहभाग नोंदवला. सांगली, कोल्हापूर, सातारा, लातूर, सावंतवाडी आदी विविध जिल्ह्यांतील 125 हून अधिक खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. यामध्ये 50 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडूंचा समावेश होता.
15 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत जांभळीचा अभय भोसले प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. मिरजचा वरद पाटील द्वितीय तर लातूरचा प्रसेंजित जांभळे तृतीय क्रमांकावर राहिला. कोल्हापूरचा सर्वेश पोतदार चौथा आणि सांगलीचा शर्विल येडेकर पाचवा क्रमांक पटकावला. विविध वयोगटांतील तसेच उत्कृष्ट मुली, यंगेस्ट प्लेअर आणि उत्कृष्ट खेळाडूंना विशेष पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत सांगलीचा आदित्य खैरमोडे विजेता ठरला. साताऱ्याचा ओंकार कडव द्वितीय तर इचलकरंजीचा रवींद्र निकम तृतीय क्रमांकावर राहिला. याशिवाय ज्येष्ठ खेळाडू, उत्कृष्ट महिला खेळाडू आणि उत्कृष्ट सांगली खेळाडू अशा विविध गटांतील खेळाडूंनाही सन्मानित करण्यात आले.
सदर स्पर्धेसाठी लागणारे चषक व पदके केपीज चेस अकॅडेमीतर्फे पुरस्कृत करण्यात आली होती, तर तक्षशीला इंटरनॅशनल स्कूलने स्पर्धेसाठी सभागृह उपलब्ध करून दिले.
स्पर्धेचे उद्घाटन तक्षशीला इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन धनंजय वाघ यांच्या हस्ते झाले. बक्षीस वितरण समारंभ चंद्रकांत वळवडे, धनंजय वाघ, विजयकुमार माने, श्रद्धा वळवडे-मगदूम (डेप्युटी सीईओ, कुरुंदवाड नगरपरिषद), आंतरराष्ट्रीय पंच पोर्णिमा उपळावीकर आणि अमेय पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.
स्पर्धेच्या मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच पोर्णिमा उपळावीकर यांनी जबाबदारी सांभाळली. तसेच करण परीट, शाहरुख कुरणे, नाझिया पटेल, अनिता भोसले आणि पूजा धनवडे यांनी पंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावत स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात मोलाचे योगदान दिले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या