प्रतिष्ठा न्यूज
सांगली, प्रतिनिधी : देशातील जनतेने विकासाच्या राजकारणावर विश्वास दाखविल्यामुळे आज २२ राज्यांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सत्तेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या बारा वर्षांत देशाने सर्वांगीण विकास साधला असून भारताची जागतिक स्तरावरची प्रतिमा अधिक मजबूत झाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील सत्तेला १२ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आठवले यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेत काँग्रेस आणि मोदी सरकारच्या कारभाराची तुलना केली. ते म्हणाले की, काँग्रेसच्या दीर्घकालीन राजवटीत विकासाची गती अपेक्षेप्रमाणे नव्हती आणि भ्रष्टाचाराच्या अनेक घटना समोर आल्या. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पारदर्शक, गतिमान आणि जनहिताचे प्रशासन दिल्याने देशाच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे.
आठवले म्हणाले की, २०१४ साली जनतेने नरेंद्र मोदी यांच्यावर विकासाचा विश्वास ठेवत केंद्रात सत्ता दिली. त्यानंतर २०१९ मध्ये अधिक मोठ्या बहुमताने जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिले. २०२४ च्या निवडणुकीतही एनडीएला जनतेचा कौल मिळाल्यामुळे आज देशातील २२ राज्यांमध्ये एनडीएची सत्ता आहे. हा जनतेचा विश्वास आणि विकासाच्या राजकारणाला मिळालेला पाठिंबा असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारताने गेल्या काही वर्षांत आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून जागतिक अर्थव्यवस्थेत दहाव्या स्थानावरून चौथ्या क्रमांकापर्यंत झेप घेतली आहे. ‘विकसित भारत २०४७’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ ही संकल्पना साकार करण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
गरीब आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या आहेत. कोरोना महामारीच्या कठीण काळात ८१ कोटींहून अधिक नागरिकांना मोफत धान्य पुरविण्यात आले. त्यामुळे गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला. तसेच २५ कोटींहून अधिक नागरिक गरिबीतून बाहेर आल्याचा दावा त्यांनी केला.
लघुउद्योजक, फेरीवाले आणि स्वयंरोजगार क्षेत्राला चालना देण्यासाठी मुद्रा योजना आणि पीएम स्वनिधी योजना प्रभावी ठरल्या आहेत. ११ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना मुद्रा कर्जाचे वाटप करण्यात आले असून ७० लाखांहून अधिक फेरीवाल्यांना पीएम स्वनिधी योजनेचा लाभ मिळाला आहे. यामुळे छोट्या व्यवसायांना आर्थिक बळ मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करत आहे. स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया तसेच अनुसूचित जाती-जमातीतील महिला उद्योजकांसाठी विविध योजनांद्वारे हजारो कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. महिलांना उद्योग-व्यवसाय क्षेत्रात पुढे आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी कल्याणासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा केली जात आहे. ग्रामीण भागातील विकास, सिंचन सुविधा, कृषी पायाभूत सुविधा आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देण्याचे कामही केंद्र सरकारकडून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य क्षेत्रात आयुष्मान भारत योजनेमुळे कोट्यवधी कुटुंबांना आरोग्य संरक्षण मिळाले आहे. गरीब नागरिकांना मोठ्या वैद्यकीय खर्चापासून दिलासा मिळावा यासाठी ही योजना प्रभावी ठरत असल्याचे आठवले यांनी नमूद केले. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांमुळे सर्वसामान्य नागरिकांना संरक्षण मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
देशाच्या सुरक्षेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यात आल्या आहेत. अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने नक्षलवादाचा प्रभाव कमी करण्यात सरकारला यश आले असून देश अधिक सुरक्षित आणि सक्षम बनत आहे. दहशतवाद, नक्षलवाद आणि गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेण्यात आल्यामुळे देशात स्थैर्य निर्माण झाले आहे, असे ते म्हणाले.
राजकीय क्षेत्रात सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर केंद्र सरकार संवेदनशील असल्याचे सांगत आठवले यांनी अनुसूचित जाती, जमाती, भटके-विमुक्त, ओबीसी आणि इतर वंचित घटकांच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या जात असल्याची माहिती दिली.
यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, नगरसेवक केदार खाडीलकर, प्रदेश सचिव जगन्नाथ ठोकळे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संजय कांबळे, आरपीआय (आठवले गट) चे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने उपस्थित मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या विविध योजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या