प्रतिष्ठा न्यूज/ हातकणंगले प्रतिनिधी
मिणचे : स्वराज्याची प्रेरणास्थान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जननी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या ३५२ व्या स्मृतीदिनानिमित्त मिणचे हायस्कूल, मिणचे येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून अभिवादन करण्यात आले. हा उपक्रम शिव स्वामी सर्वहिताय बहुद्देशीय संस्था, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राहुल सावर्डेकर यांनी "आजचा तरुण आणि महामानवांचे जयंती व स्मृतीदिन" या विषयावर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले.
तसेच पल्लवी कदम यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव प्रा. नितीन कदम यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कार्याचा, त्यागाचा आणि शिवरायांवर झालेल्या संस्कारांचा आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापिका श्रीमती आर. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर संचालक योगेश कांबळे यांनी आभार मानले. या उपक्रमासाठी संतोष पाटील व युवा नेते सदाशिव शेळके यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण होण्यासह शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या