प्रतिष्ठा न्यूज /कोल्हापूर प्रतिनिधी
नांदणी: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील 'महादेवी' उर्फ माधुरी हत्तीणीच्या पुनरागमनाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. गेल्या वर्षभरापासून गुजरातच्या जामनगर येथील 'वनतारा' (Vantara) केंद्रात उपचार घेत असलेली माधुरी आता पूर्णपणे निरोगी झाली आहे. पुढील एका महिन्याभरात ती आपल्या लाडक्या नांदणी भूमीत परतण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, तिच्या परतीच्या हालचालींना वेग आला आहे.
वनताराच्या टीमकडून जागेची पाहणी
या पार्श्वभूमीवर, गुजरातच्या वनतारा वन्यजीव केंद्राची उच्चस्तरीय टीम मंगळवारी (१६ जून) नांदणी येथे दाखल झाली. या पथकाने दिवसभर नांदणी मठात तळ ठोकून माधुरीच्या पुनर्वसनाबाबत आणि सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण चर्चा व पाहणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीच्या (HPC) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, माधुरीच्या वास्तव्यासाठी नांदणी मठाच्या परिसरात संपूर्ण अत्याधुनिक व्यवस्था आणि सुरक्षित पुनर्वसन केंद्र उभारले जात आहे. ही व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल समितीकडे पाठवला जाईल.
वनताराकडून अधिकृत संदेश आणि व्हिडिओ जारी
वनतारा संस्थेने अधिकृत भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, "एक वर्षापूर्वी जेव्हा माधुरी आमच्याकडे आली, तेव्हा तिला विशेष वैद्यकीय उपचारांची गरज होती. आमच्या पशुवैद्यक, आहारतज्ज्ञ आणि काळजीवाहूंच्या अथक परिश्रमांमुळे ती आता पूर्वीपेक्षा अधिक सक्षम, निरोगी आणि आत्मविश्वासपूर्ण झाली आहे. कोल्हापूरकर, आम्ही माधुरीला परत पाठवत आहोत आणि ती तिच्या घरी परतण्यास पूर्णपणे सज्ज आहे." या संदर्भातील एक विशेष व्हिडिओही वनताराने सोशल मीडियावर जारी केला आहे.
४०० वर्षांची परंपरा आणि भाविकांच्या श्रद्धेचा विजय
नांदणी जैन मठात ऐतिहासिक काळापासून हत्ती पाळण्याची सुमारे ४०० वर्षांची परंपरा आहे. गेल्या वर्षी जुलै २०२५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून माधुरीला वनतारा येथे पाठवण्यात आले होते. मात्र, तिच्या जाण्याने स्थानिक नागरिकांमध्ये आणि भाविकांमध्ये तीव्र भावना उमटल्या होत्या व तिला परत आणण्यासाठी मोठे जनआंदोलन उभे राहिले होते. आता महाराष्ट्र शासन, नांदणी मठ प्रशासन आणि वनतारा यांच्यातील सकारात्मक घडामोडींमुळे माधुरीच्या घरवापसीचा मार्ग सुकर झाला असून कोल्हापुरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या