प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : लठ्ठे एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंतीबाई कळंत्रे आक्का प्राथमिक विद्यामंदिर, नेमिनाथनगर, सांगली येथे सोमवार, दि. 15 जून 2026 रोजी नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेशोत्सव 2026 मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
शाळेच्या नवीन इमारतीत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले. प्रभात फेरी, विद्यार्थ्यांचे औक्षण, आकर्षक सेल्फी पॉइंट, विविध कार्टून पात्रांची सजावट तसेच कार्टून वेशातील कलाकारांमुळे शाळेचा परिसर रंगतदार झाला होता. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी शासनामार्फत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करून विद्यार्थ्यांच्या नव्या शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शाळेची माजी विद्यार्थिनी कु. श्वेता शिंदे हिची उपस्थिती होय. ‘प्लास्टिक बाबा’ चित्रपटातील भूमिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये तिच्याविषयी विशेष आकर्षण होते. तिने विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी संदेश दिला. यावेळी तिचे आई-वडीलही उपस्थित होते.
कार्यक्रमास शाळेचे चेअरमन राहुल पाटील, सदस्य पा. बा. पाटील, सौ. सुनीता उपाध्याय, मुख्याध्यापक शांतिनाथ चौगुले, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अभिजीत भिंगारदिवे, रेश्मा अवताडे, स्नेहा चौगुले आणि स्वाती भोसले उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रवेशोत्सव यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सर्वांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम आनंददायी, संस्मरणीय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
"आनंदी शाळा – गुणवत्तापूर्ण शिक्षण – उज्ज्वल भविष्य" या संकल्पनेला साजेसा हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक प्रवासाची प्रेरणादायी सुरुवात ठरला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या