प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगाव : युरियासह सर्व शासन अनुदानित खते शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार उपलब्ध करून द्यावीत, खत विक्रीसाठी अनावश्यक वस्तूंची लिंकिंग करून शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकू नये, तसेच प्रत्येक सेवा केंद्रामार्फत अनुदानित खतांची विक्री नियमितपणे करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने कृषी विभागाकडे करण्यात आली आहे.
यासंदर्भात कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, प्रत्येक खत विक्री केंद्रासमोर उपलब्ध असलेल्या शासन अनुदानित खतांच्या शिल्लक साठ्याचा फलक लावणे सक्तीचे करावे, जेणेकरून शेतकऱ्यांना खत उपलब्धतेची पारदर्शक माहिती मिळेल, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच खत विक्री केंद्रांवरील काउंटर सेलर यांनी शेतकरी राजांशी सन्मानपूर्वक वागणूक ठेवावी, त्यांना चांगल्या भाषेत मार्गदर्शन करून खतांबाबत सखोल माहिती द्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. या मागण्यांवर सात दिवसांत ठोस कारवाई करण्यात यावी, अन्यथा निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीची जबाबदारी कृषी विभागाची राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, तासगावचे कृषी अधिकारी मानफोडे साहेब यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
यावेळी संजय दादा पाटील, प्रदीप काका माने-पाटील, वसंत सुतार (वडगाव), संजय पवार (वडगाव) तसेच तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या