सांगली, प्रतिनिधी : सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत जबरी चोरी, घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सराईत आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत एकूण ८ गुन्हे उघडकीस आले असून ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव करण ऊर्फ करंज राजा शिंदे (वय १९, रा. हुबालवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) असे आहे. चिवचिवणी वांगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना एलसीबीच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तासगाव परिसरातील पाचवा मैल येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान आरोपीने देवराष्ट्रे, कुंडल, पलूस, आष्टा, कुरळप व इतर परिसरात साथीदारांसह जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेली दुचाकीही आरोपीकडून जप्त करण्यात आली.
पोलीसांनी आरोपीकडून ५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (मंगळसूत्र, गंठण, बोरमाळ, कर्णफुले, अंगठी आदी) तसेच हिरो कंपनीची एक मोटारसायकल असा एकूण ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तपासात आरोपीने खालील पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यामध्ये पलूस, आष्टा, कुरळप, कुंडल, चिवचिवणी वांगी तसेच सातारा शहर येथील गुन्ह्यांचा समावेश आहे.
या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव व त्यांच्या पथकाने विशेष प्रयत्न केले.
पोलीसांनी सांगितले की, आरोपीसोबत गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणखी पाच साथीदारांचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे. आरोपी व त्याचे साथीदार हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध सांगलीसह शेजारील जिल्ह्यांमध्ये जबरी चोरी, घरफोडी, दरोडा आणि दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या