सांगली : लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगलीच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाचे आयोजन शनिवारी (दि. १३ जून) कै. अॅड. केशवराव आप्पाजी चौगुले सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रो. (डॉ.) माणिकराव साळुंखे यांनी शाळा व महाविद्यालये ही विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारी कार्यशाळा असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे शासक समिती अध्यक्ष राजीव पाटील होते. यावेळी संस्थेचे चेअरमन शांतिनाथ कांते, व्हाइस चेअरमन चंद्रकांत पाटील, खजिनदार भालचंद्र पाटील तसेच विश्वस्त समितीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौगुले यांच्यासह संस्थेच्या विविध शाखांतील कर्मचारी, पदाधिकारी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. साळुंखे म्हणाले की, दिवाणबहाद्दूर अण्णासाहेब लठ्ठे यांचा शैक्षणिक व वैचारिक वारसा सांगलीकरांनी जपला आहे. आजच्या काळात एखादी संस्था उभारणे आणि ती यशस्वीपणे टिकवून ठेवणे हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘छत्रपती शाहू महाराजांचे चरित्र’ या ग्रंथामुळे शिवाजी विद्यापीठात शाहू संशोधन केंद्राच्या स्थापनेला चालना मिळाली.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापराचा संदर्भ देताना ते म्हणाले, “ए.आय. हे दुधारी अस्त्र आहे. ती माहिती देऊ शकते; मात्र ज्ञान, अनुभव, शहाणपण आणि मूल्यांची जपणूक करण्याचे काम शिक्षकांनाच करावे लागते. विद्यार्थ्यांना केवळ माहिती नव्हे, तर सुज्ञ आणि जबाबदार नागरिक बनविण्याचे शिक्षण देणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी बुद्धिमत्तेची पर्यायी नसून पूरक आहे.”
संस्थेचे चेअरमन शांतिनाथ कांते यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या ७५ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. “संस्थेने शिक्षण क्षेत्रात स्वतःचा स्वतंत्र ‘लठ्ठे ब्रँड’ निर्माण केला असून अमृत महोत्सवी वर्ष ‘अमृत पर्व’ म्हणून ओळखले जाईल. शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल करणारी संस्थेची भविष्यातील वाट अधिक उज्ज्वल असेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषणात राजीव पाटील यांनी संस्थेच्या सेवक वर्गाचे योगदान अधोरेखित करताना, “विद्यार्थी आणि कर्मचारी हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारी ही संस्था आहे. संस्थेचा सेवक वर्ग हा तिचा कणा आहे,” असे सांगितले. तसेच दिवाणबहाद्दूर अण्णासाहेब लठ्ठे यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला.
यावेळी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेपासूनच्या इतिहासाचे सिंहावलोकन करणाऱ्या ‘अमृत पर्व’ या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनाली पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रमोद चौगुले यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन चंद्रकांत पाटील यांनी केले. अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभामुळे संस्थेच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली परंपरेला उजाळा मिळाला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या