प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:बोरगाव ते शिरढोण राष्ट्रीय महामार्गावरील पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक, प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता.पावसाळ्यामुळे या खड्ड्यांची तीव्रता वाढल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेत प्रभाकर बाबा पाटील युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांनी युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेत रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून तात्पुरते मुरुमीकरण केले.युवाशक्तीच्या या जनहिताच्या उपक्रमामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून वाहतुकीसही काही प्रमाणात सुरळीतपणा आला आहे. जनतेच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत कोणतीही शासकीय कार्यवाहीची प्रतीक्षा न करता कार्यकर्त्यांनी युद्धपातळीवर हे काम पूर्ण केले.
दरम्यान, युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती तातडीने करण्यात यावी,अशी जोरदार मागणी केली.यावर अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच आवश्यक दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली.जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी नसतानाही पुढाकार घेऊन प्रत्यक्ष काम करणाऱ्या प्रभाकर बाबा पाटील युवाशक्तीच्या कार्याचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत असून, "प्रश्न कोणताही असो, युवाशक्ती जनतेसोबत उभी राहते," अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या