प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : माजी नगरसेवक उदय बेलवलकर आणि माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या आयुक्त संजिता महापात्र यांची भेट घेऊन प्रभाग क्रमांक १४ मधील विविध नागरी समस्यांबाबत निवेदन सादर केले. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.
निवेदनात सर्वप्रथम वाढीव घरपट्टीच्या मुद्द्यावर फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली. वाढीव घरपट्टीमुळे नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, दाखल झालेल्या हरकतींवर सकारात्मक फेरतपासणी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
तसेच प्रभाग क्रमांक १४ मधील झाडांच्या वाढलेल्या फांद्या तातडीने छाटाव्यात, कारण जोरदार पावसामुळे त्या पडण्याचा धोका असून वीजवाहिन्यांवर फांद्या पडल्याने वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
पाणीपुरवठ्याच्या समस्येकडे लक्ष वेधताना, प्रभागात कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक, विशेषतः महिलांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. तसेच परिसरातील पाईपलाईन गळतीचे प्रमाण वाढले असून मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे दुरुस्तीला विलंब होत असल्याने या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग हा महापुरग्रस्त क्षेत्र असल्याने गटारांची चेंबर्स ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व चेंबर्सची गाळ काढून स्वच्छता करावी तसे उघड्या चेंबर्सवर झाकणे तातडीने बसवावीत, जेणेकरून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी मागणीही करण्यात आली.
याशिवाय प्रशिक चौक ते हरिपूर रोड दरम्यानची पाणीगळती अद्याप दुरुस्त न झाल्याने रस्त्यावर खड्डे पडून अपघात घडत आहेत आणि रस्त्याचे कामही रखडले आहे. त्यामुळे संबंधित गळती तातडीने दुरुस्त करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
या सर्व विषयांवर चर्चा करून प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी बेलवलकर यांनी केली. यावेळी स्थायी सभापती तथा नगरसेवक अतुल माने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या