प्रतिष्ठा न्यूज | योगेश रोकडे
सांगली : ज्येष्ठ अनुवादक, लेखक आणि हिंदी भाषा-साहित्याचे व्यासंगी अभ्यासक तसेच विलिंग्डन महाविद्यालयातील हिंदी विभागाचे माजी प्राध्यापक प्रा. बळवंत जेउरकर यांचे आज दिनांक ११ जून २०२६ रोजी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने साहित्य, अनुवाद आणि शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून साहित्यविश्वाने एका अभ्यासू आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला गमावले आहे.
प्रा. जेउरकर यांनी आयुष्यभर हिंदी साहित्याच्या समृद्धीसाठी मोलाचे योगदान दिले. हिंदी भाषांतील अनेक दर्जेदार ग्रंथांचा त्यांनी उत्कृष्ट अनुवाद करून दोन भाषांतील साहित्यिक दुवा अधिक भक्कम केला. त्यांच्या लेखनात अभ्यासपूर्ण दृष्टी, भाषेवरील प्रभुत्व आणि साहित्यिक संवेदनशीलता यांचा सुंदर संगम दिसून येत असे.
साहित्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अध्यापन, संशोधन, लेखन आणि अनुवाद या सर्व क्षेत्रांत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला.
कायम लेखन आणि साहित्यसेवेत रममाण असलेल्या प्रा. बळवंत जेउरकर यांच्या निधनाची बातमी साहित्यप्रेमी, विद्यार्थी आणि सहकाऱ्यांसाठी अत्यंत क्लेशदायी ठरली आहे. विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून, त्यांच्या साहित्यसंपदेच्या रूपाने त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील. प्रा. बळवंत जेउरकर यांना भावपूर्ण विनम्र अभिवादन.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या