सांगली प्रतिनिधी : सांगली- मिरज- कुपवाड महानगरपालिका प्रशासनाने विनापरवाना आणि दीर्घकाळ अनधिकृतपणे गैरहजर राहणाऱ्या ३७ कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करत त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. महापालिका आयुक्त संजीता महापात्र यांच्या आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली असून, यामुळे महापालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
महापालिकेच्या विविध विभागांतील हे कर्मचारी सक्षम प्राधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता आणि रजा मंजूर नसताना सलग ९० दिवसांहून अधिक काळ गैरहजर असल्याचे तपासणीत आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या चारही क्षेत्रीय कार्यालयांतील हजेरी मस्टरची कसून तपासणी वॉर्ड मुकादम, स्वच्छता निरीक्षक आणि सहाय्यक आयुक्तांच्या माध्यमातून करण्यात आली. या तपासणीत दीर्घकाळ अनुपस्थित असलेले कर्मचारी आढळून आले.
विभागनिहाय कारवाई
आरोग्य व स्वच्छता विभाग : २८ कर्मचारी
पाणीपुरवठा विभाग : ५ कर्मचारी
अग्निशमन विभाग : १ कर्मचारी
जलनिस्सारण विभाग : १ कर्मचारी
सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) : १ कर्मचारी
सुरक्षा विभाग : १ कर्मचारी
निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये प्रामुख्याने सफाई कामगार आणि शिपायांचा समावेश आहे.
अत्यावश्यक सेवांवर परिणाम
आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि अग्निशमन या अत्यावश्यक सेवांशी संबंधित कर्मचारी दीर्घकाळ गैरहजर राहिल्यामुळे संबंधित विभागांवर अतिरिक्त कामाचा ताण निर्माण झाला होता. अनेक भागांत कचरा व्यवस्थापन व पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी वाढल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.
विभागीय चौकशी सुरू
महापालिका प्रशासनाने केवळ निलंबनावर न थांबता संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात विभागीय चौकशी सुरू केली आहे. कार्यालयीन शिस्तीचा भंग आणि गंभीर गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर सेवेतून बडतर्फीची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
निलंबन कालावधीत संबंधित कर्मचाऱ्यांचे मुख्यालय त्यांचे मूळ विभाग राहणार असून, प्रशासनाच्या परवानगीशिवाय त्यांना अन्य कोणतेही काम करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त संजीता महापात्र यांनी कामचुकारपणा आणि शिस्तभंग खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा देत भविष्यातही अशा प्रकारच्या प्रकरणांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या