सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्हा क्रिकेटिचार असोसिएशनचे चेअरमन संजयजी बजाज यांच्या मार्गदर्शनाखाली व सांगली जिल्हा अंपायर असोसिएशनच्या विद्यमाने नवोदित मुला-मुलींसाठी दोन दिवसीय अंपायर मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले.
या शिबिरामध्ये सुमारे ३० ते ४० युवक तसेच ४ मुलींनी सहभाग नोंदविला. क्रिकेटमधील अंपायरिंगची मूलभूत तत्त्वे, नियम, निर्णय प्रक्रिया, मैदानावरील जबाबदाऱ्या तसेच आधुनिक अंपायरिंगमधील विविध पैलूंविषयी सहभागींचे मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरात वरिष्ठ अंपायर दिलीप सामंत, प्रकाश फाळके, प्रमोद कोल्हे, अजहर सर व चौगुले सर यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवातून सहभागी युवक-युवतींना अंपायरिंग क्षेत्रातील संधी व आव्हानांची माहिती मिळाली.
उद्घाटन समारंभाला सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य किशोरभाई शहा, युसूफ जमादार, अमित फारणे तसेच महाराष्ट्र राज्य अंपायर असोसिएशनचे सदस्य प्रीतेश कोठारी यांची प्रमुखही उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप सामंत यांनी केले. स्वागत अजहर सर, प्रमोद कोल्हे व चौगुले सर यांनी केले, तर प्रकाश फाळके यांनी आभार प्रदर्शन केले.
या शिबिरामुळे जिल्ह्यातील नवोदित अंपायरांना योग्य दिशा मिळाली असून भविष्यात दर्जेदार अंपायर घडविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशन व सांगली जिल्हा अंपायर असोसिएशनच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या