सांगली, दि. २२ : सांगली जिल्हा अॅमॅच्युअर जिम्नॅस्टिक असोसिएशनचे सचिव तथा आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक प्रशिक्षक दीपक सावंत यांची महाराष्ट्र अॅमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशनच्या राज्य कार्यकारिणीवर सहसचिवपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सांगली जिल्हा अॅमॅच्युअर जिम्नॅस्टिक असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र अॅमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशनच्या २०२६ ते २०३० या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत दीपक सावंत यांची बिनविरोध सहसचिवपदी निवड झाली. या निवडीबद्दल संघटनेचे खजिनदार तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते बापूसाहेब सन्मेलावाले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
दीपक सावंत यांनी अनेक राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविले असून जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील जिम्नॅस्टिक स्पर्धांचे यशस्वी आयोजनही केले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ही निवड झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी माजी पालकमंत्री व आमदार सुरेश भाऊ खाडे, संघटनेचे अध्यक्ष गौतम पाटील, उपाध्यक्ष अक्षयभैया पाटील, अरुण देवल, दिलीप जोशी यांचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगण्यात आले. तसेच विजय मगदूम, राजू चव्हाण, हेमंत सावंत, विक्रांत लांडगे, काजल काळे आणि सुमित सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दीपक सावंत यांच्या राज्यस्तरीय निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या