सांगली, प्रतिनिधी : मराठी चित्रपटसृष्टीतील पहिल्या सिनेमॅटिक युनिव्हर्सची सुरुवात करणारा बहुचर्चित आणि भव्यदिव्य "घबाडकुंड" हा चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असून, चित्रपटाच्या प्रचारासाठी अभिनेते देवदत्त नागे, संदीप पाठक, शशांक शेंडे, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, वैष्णवी कल्याणकर यांच्यासह चित्रपटाचे निर्माते डॉ. रसिक कदम आणि दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील हे ११ जून रोजी सांगली दौऱ्यावर येणार आहेत. ही माहिती केंद्र सरकार व खासदार रामदास आठवले युथ फाउंडेशन संचलित हौसाई वृद्धाश्रमचे चेअरमन सिद्धार्थ कांबळे यांनी दिली.
या चित्रपटाच्या प्रमोशन साठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदेश भंडारे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मराठी चित्रपटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
"घबाडकुंड" या चित्रपटात संदीप पाठक, कुशल बद्रिके, ‘जय मल्हार’ फेम देवदत्त नागे, गौरव मोरे, शशांक शेंडे, प्राजक्ता हनमघर, स्मिता अंजुटे पायगुडे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर आणि साहिल अनलदेवर यांसारख्या लोकप्रिय कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रीतम पाटील यांनी केले असून कथा-पटकथा लेखन संजय नवगिरे आणि अक्षय धर्मपाल यांचे आहे. कार्यकारी निर्माते विष्णू घोरपडे असून, दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध फायटर मास्टर कार्तिक यांनी अक्शन दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.
निर्माते डॉ. रसिक कदम यांची निर्मिती असलेला हा बिग बजेट मराठी चित्रपट येत्या १९ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे.
जीवनात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम, चिकाटी आणि संघर्ष आवश्यक असतो. मात्र अनेकांना अचानक एखादे मोठे ‘घबाड’ मिळावे, अशी अपेक्षा असते. अशाच एका रहस्यमय घबाडाभोवती फिरणारी थ्रिलर, अक्शन, विनोद आणि भावनिक घटनांनी परिपूर्ण कथा "घबाडकुंड"मध्ये पाहायला मिळणार आहे. चित्रपटात अनेक चमत्कारिक आणि अनपेक्षित घडामोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.
चित्रपट प्रचार दौऱ्यादरम्यान ११ जून रोजी सायंकाळी ५ वाजता चित्रपटाची संपूर्ण टीम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करणार असून, त्यानंतर सांगलीचे आराध्य दैवत श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी पेठभाग येथील सांगली संस्थानच्या पंचायतन मंदिरात उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्व सांगलीकरानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या