सांगली प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सांगलीतील ३५७ बेघर कुटुंबांना तातडीने घरे देण्यात यावीत, या मागणीसाठी सांगली जिल्हा निवारा संघाच्या शिष्टमंडळाने महानगरपालिकेच्या आयुक्त संजिता महापात्र यांना निवेदन सादर केले.
यावेळी संघटनेचे नेते कॉ. शंकर पुजारी यांनी सांगितले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या रिट पिटीशन क्र. ३४१२/२०१५ मधील स्पष्ट आदेशानंतरही मागील आठ वर्षांपासून ३५७ बेघर लाभार्थ्यांना घरांचा ताबा मिळालेला नाही. त्यामुळे सांगली सर्किट हाऊसच्या पाठीमागील जागा या लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून देऊन तातडीने घरकुल योजना राबवावी, अशी मागणी करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाने १० जून २०१६ रोजी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बेघरांसाठी घरे बांधण्याबाबत सांगली महापालिकेला आदेश दिले होते. या संदर्भातील शासनाचे पत्र तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत निवेदनासोबत आयुक्तांना सादर करण्यात आली.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, मागील आठ वर्षांत महापालिकेने केवळ लाभार्थ्यांची निवड करून काहींना प्रमाणपत्रे दिली आहेत. त्यापैकी १३९ लाभार्थ्यांना सदनिकांच्या मालकीची प्रमाणपत्रेही देण्यात आली; मात्र प्रत्यक्ष घरांचा ताबा अद्याप मिळालेला नाही.
यावर प्रतिक्रिया देताना आयुक्त संजिता महापात्र यांनी न्यायालयीन आदेश आणि गृहनिर्माण विभागाच्या सूचनांनुसार लवकरच निर्णय घेऊन बेघरांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले. तसेच या प्रक्रियेचा पाठपुरावा महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्यामार्फत करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आयुक्तांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल निवारा संघाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. याच विषयावर महानगरपालिकेचे महापौर धनंजय सूर्यवंशी यांच्याशीही चर्चा करण्यात आली. प्रशासनाकडून जागा उपलब्धतेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बेघरांसाठी घरे उभारण्यास प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे संघटनेने सांगितले.
यानंतर संघटनेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत महापालिकेला १५ दिवसांची मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. या कालावधीत बेघरांना घरे देण्याबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच आवश्यक असल्यास पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशारा कॉ. शंकर पुजारी यांनी दिला.
शिष्टमंडळात कॉ. शंकर पुजारी, विशाल बडवे, सिराज शेख, प्रवीण भोरे, रोहित मुळीक आणि नंदा कामटे यांचा समावेश होता.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या