सांगली, दि. १० जून : राजर्षी छत्रपती शाहू कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सांगली येथे आज नेत्रदान जनजागृती, नेत्रदान नोंदणी शिबिर व व्याख्यान या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांना "नेत्र हेच नवे धन" या विषयावर मार्गदर्शन करत नेत्रसंवर्धन व नेत्रदानाचे महत्त्व पटवून दिले.
मार्गदर्शन करताना डॉ. पाटील म्हणाले, “डोळे हीच खरी संपत्ती आहे. योगी जसा मार्ग दाखवतो, तसे डोळे आपल्याला आयुष्याचा मार्ग दाखवतात. त्यामुळे डोळ्यांची नियमित काळजी घेणे, वेळोवेळी तपासणी करणे आणि नेत्रदानाचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना डोळ्यांच्या आरोग्याविषयी माहिती देताना मोबाईल व संगणकाचा अतिरेकी वापर टाळण्याचा, डोळ्यांचे नियमित व्यायाम करण्याचा आणि संतुलित आहार घेण्याचा सल्ला दिला.
यावेळी ते पुढे म्हणाले की, “स्नेह, प्रेम आणि आपुलकी डोळ्यांतूनच व्यक्त होते. शब्दांपेक्षा डोळे अधिक बोलतात. विद्या, हातातील कौशल्य आणि चांगली दृष्टी यांचा संगम आयुष्याला यशस्वी बनवतो.” त्यांच्या या प्रेरणादायी विचारांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अर्चना शिंदे प्रमुख उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व सांगितले. “डॉ. मनोज पाटील यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांप्रमाणे योग्य दृष्टीकोन आणि निरोगी दृष्टी हेच यशाचे खरे गमक आहे,” असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अधिकारी प्रा. किशोर चांदुरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सादिक कराडकर यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. नेत्रदान जनजागृती व नोंदणी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेत्रदानाबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण झाल्याचे यावेळी दिसून आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या