प्रतिष्ठा न्यूज
हातकणंगले प्रतिनिधी : हातकणंगले शहराच्या पाणीपुरवठा सक्षमीकरण व बळकटीकरणासाठी तब्बल ६१ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून शहराच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेसाठी खासदार धैर्यशील माने यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून राज्य शासनाने या महत्त्वाकांक्षी योजनेस हिरवा कंदील दिला आहे.
या योजनेसाठी १९ कोटी रुपयांचा निधी तातडीने कार्यान्वित करण्यात आला असून उर्वरित ४२ कोटी रुपयांचा निधी केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्या उपस्थितीत हातकणंगले नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अजितसिंह (काका) पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.
हातकणंगले नगरपंचायतीच्या निवडणुकीवेळी शहरातील पाणीटंचाई हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरला होता. शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार उपलब्ध पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातकणंगले दौऱ्यादरम्यान शहरासाठी स्वतंत्र व सक्षम पाणीपुरवठा योजना मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले होते.
दरम्यान, खासदार धैर्यशील माने, नगराध्यक्ष अजितसिंह (काका) पाटील तसेच नगरपंचायत प्रशासनाने या योजनेसाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून ६१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येणार असून भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन आवश्यक पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत.
या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यानंतर हातकणंगले शहरातील पाणीपुरवठा अधिक नियमित, सक्षम व शाश्वत होणार असून नागरिकांच्या दीर्घकालीन पाणीप्रश्नावर मोठा दिलासा मिळणार आहे. या मंजुरीमुळे हातकणंगलेच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या