प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
मुंबई, दि. 16 जून 2026 – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासकीय विभागांच्या पुनर्रचनेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत माहितीनुसार, ‘शालेय शिक्षण व क्रीडा विभाग’ याचे विभाजन करून ‘शालेय शिक्षण विभाग’ आणि ‘क्रीडा विभाग’ असे दोन स्वतंत्र विभाग स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील धोरणे, योजना आणि प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.
मंत्रिमंडळ बैठकीतील प्रमुख निर्णय
🔹 शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे विभाजन
शालेय शिक्षण आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रांसाठी स्वतंत्र मंत्री, सचिव व प्रशासकीय यंत्रणा कार्यरत राहणार आहे.
🔹 सामान्य प्रशासन विभागाचे विभाजन
‘माहिती व जनसंपर्क’ आणि ‘राजशिष्टाचार’ असे दोन स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात येणार आहेत.
🔹 महसूल विभागाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय
भूसंपादन विषय वन विभागाकडून महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. तसेच नोंदणी व मुद्रांक शुल्क हा विषय महसूल विभागाकडेच कायम राहणार आहे.
🔹 पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग स्वतंत्र
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे विभाजन करून ‘पर्यटन विभाग’ आणि ‘सांस्कृतिक कार्य विभाग’ असे दोन स्वतंत्र विभाग करण्यात येणार आहेत.
प्रशासन अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न
प्रत्येक क्षेत्राला स्वतंत्र धोरणात्मक दिशा मिळावी, योजनांची अंमलबजावणी वेगाने व्हावी आणि प्रशासन अधिक कार्यक्षम व्हावे, या उद्देशाने हे निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
शिक्षण आणि क्रीडा विभाग स्वतंत्र झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न, क्रीडा सुविधा, खेळाडूंसाठीच्या योजना आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्यातील प्रशासकीय रचनेत हा एक महत्त्वाचा बदल मानला जात असून, नव्या विभागांसाठी मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
– स्रोत : मुख्यमंत्री कार्यालय, महाराष्ट्र शासन (CMO Maharashtra)
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या