प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:संजीवनगिरी वरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने अधिक मास,कर्क राशीतील उच्चस्थ गुरू आणि पंचरात्रिपर्वाच्या दुर्मिळ संगमावर आयोजित करण्यात आलेला भव्य श्रीदत्तयाग सोहळा सोमवारी सायंकाळी वैदिक मंत्रोच्चारात पूर्णाहुती अर्पण करून आणि भव्य महाआरतीने भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.सुमारे ८० ते ९५ वर्षांनी एकदाच लाभणाऱ्या या दुर्मिळ आध्यात्मिक योगावर आयोजित करण्यात आलेल्या या महायज्ञात महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांसह विविध भागांतील हजारो भाविकांनी सहभागी होत आध्यात्मिक पुण्यलाभ प्राप्त केला.दोन दिवस चाललेल्या या धार्मिक पर्वामुळे संपूर्ण संजीवनगिरी परिसर दत्तनामाच्या अखंड गजराने दुमदुमून गेला होता.परमपूज्य परमात्मराज महाराज आणि श्री देविदास महाराज यांच्या पावन उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळ्याने भक्ती,श्रद्धा आणि अध्यात्माचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.यज्ञाच्या प्रारंभी विधिवत देवतांचे आवाहन, पूजन आणि संकल्प करण्यात आला.प्रमुख पौरोहित्याची जबाबदारी श्याम भटजी मांगूर यांनी पार पाडली.वैदिक ऋचा,मंत्रोच्चार आणि अखंड दत्तनामाच्या गजरात यज्ञकर्म अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न झाले.यज्ञासाठी उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात अनेक यज्ञकुंडांची आकर्षक मांडणी करण्यात आली होती.केळीचे खांब, आंब्याच्या डहाळ्या,फुलमाळा आणि पारंपरिक सजावटींनी यज्ञमंडपाला दिव्यता प्राप्त झाली होती. होमकुंडांजवळ काढलेल्या सुंदर रांगोळ्यांनी धार्मिक वातावरणात अधिक भर घातली.यज्ञासाठी बसलेल्या भाविकांबरोबरच हजारो भाविकांनी यज्ञमंडप,दत्तात्रेय महापूजा आणि विविध पीठांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दोन दिवसांत किती भाविकांनी भेट दिली याची अचूक गणना करणेही कठीण ठरले.सतत भाविकांची ये-जा सुरू असल्याने संपूर्ण परिसर भाविकांनी फुलून गेला होता.
या विशेष सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांना खास तयार करण्यात आलेले दत्तयंत्र कार्ड देण्यात आले.स्त्री-पुरुष, आबालवृद्ध तसेच विविध जाती-धर्मांतील भाविकांनी श्रद्धापूर्वक सहभाग नोंदविला.कागल,कोल्हापूर,निपाणी,सांगली,चंदगड,सिंधुदुर्ग, रत्नागिरी,जळगाव,छत्रपती संभाजीनगर,नांदेड,सातारा,पुणे,मुंबई यांसह महाराष्ट्र,कर्नाटक आणि गोवा राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते.यज्ञकाळात भाविकांसाठी सकाळी अल्पोपहार आणि दुपारी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मुक्कामासाठी आलेल्या भाविकांची संख्याही मोठी असल्याने देवस्थान परिसरातील सर्व हॉल आणि खोल्या भाविकांनी भरून गेल्या होत्या.
सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी देवस्थान समिती,स्वयंसेवक आणि युवकवर्गाने रात्रंदिवस परिश्रम घेतले.त्यांच्या नियोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.
सोमवारी सायंकाळी वैदिक मंत्रोच्चारात पूर्णाहुती अर्पण करण्यात आल्यानंतर परमपूज्य परमात्मराज महाराजांच्या उपस्थितीत श्रीगुरू दत्तात्रेयांची भव्य महाआरती करण्यात आली.यावेळी हजारो भाविकांनी दत्तनामाचा जयघोष करत भक्तिभावाने सहभाग घेतला.महाआरतीनंतर भाविकांनी परमात्मराज महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.यावेळी डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी.पाटील,आमदार शशिकला जोल्ले,माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले,आमदार गणेश हुक्केरी, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, माजी खासदार संजयकाका पाटील, उद्योजक जाधव बंधू, अॅड.दीपक कांबळे,चंद्रकांत कोठीवाले,युवा नेते उत्तम पाटील,माजी आमदार सुभाष जोशी,उद्योजक सुखदेवसिंह धिल्लोन यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.
यावेळी बोलताना परमपूज्य परमात्मराज महाराज म्हणाले, "अशा धार्मिक सोहळ्यांमुळे समाजात अध्यात्माबद्दल जागृती निर्माण होते. श्रद्धा अधिक दृढ होते. भाविकांच्या निस्वार्थ सहकार्यामुळेच हा दोन दिवसांचा श्रीदत्तयाग सोहळा यशस्वीपणे पूर्णत्वाला गेला असून सर्व सहकाऱ्यांचे आणि उपस्थित भाविकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो."दुर्मिळ आध्यात्मिक योगावर संपन्न झालेला हा भव्य श्रीदत्तयाग सोहळा आणि त्याची दिव्य अनुभूती भाविकांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील,अशी भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या