विटा, प्रतिनिधी : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाला आता जिल्हाभरातून पाठिंबा मिळू लागला असून, वाळवा तालुक्यातील विविध चळवळींतील नेते व शेतकरी कार्यकर्त्यांनी विटा येथे येऊन आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना साथ दिली. वाळवा आणि कुंडल या क्रांतीभूमीने अन्यायाविरोधातील आपली परंपरा कायम ठेवत शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या संघर्षात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.
पलूस, कडेगाव आणि खानापूर तालुक्यांमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात सुरू असलेल्या लोकआंदोलनाचे नेतृत्व करणारे शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक ॲड. दिपक लाड यांच्या नेतृत्वाखालील लढ्याला बळ देण्यासाठी वाळवा तालुक्यातील अनेक नेते विटा येथे दाखल झाले. विशेष म्हणजे, स्वतःची जमीन या प्रकल्पात जात नसतानाही शेतकऱ्यांच्या जमिनी वाचाव्यात यासाठी ॲड. लाड यांनी गावागावांत आत्मक्लेश यात्रा काढून जनजागृती केली असून, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माता-भगिनींनाही या लढ्यात संघटित करण्याचे काम केले आहे.
यावेळी लोकचळवळीतील ज्येष्ठ नेते बी. जी. (काका) पाटील, कॉम्रेड धनाजी गुरव, प्रा. अनिल पाटील, ॲड. विजय पाटील, सरपंच जयराज पाटील यांच्यासह शेकडो शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला.
दरम्यान, वाळवा तालुक्यातील आंदोलक नेते इंद्रजीत मोरे (उरण-इस्लामपूर) यांनीही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र भूमिका मांडली. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींचे संरक्षण आणि काळ्या आईचे रक्षण करण्यासाठी हा संघर्ष सुरू असून, या लढ्याला वाळवा तालुक्यातूनही मोठी ताकद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी, शेती व्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार असल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरकारने हा प्रकल्प पुनर्विचारासाठी थांबवावा, अशी मागणी पुन्हा एकदा केली. विटा येथे झालेल्या या एकजुटीच्या शक्तिप्रदर्शनामुळे आंदोलनाला नवे बळ मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या