प्रतिष्ठा न्यूज | सांगली
सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन इसमांना ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पाच देशी बनावटीची पिस्तुले, पाच जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी असा एकूण २ लाख ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, मिरज शहरातील कमानवेस ते रमामाता नगर ऑक्सिजन पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन व्यक्ती पिस्तुलांची विक्री करण्यासाठी येणार आहेत.
माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांची नावे अधीन संजय माळी (वय २६, रा. माळीनगर, कडेगाव) आणि अमन उर्फ मोहिदीन बशीर गोंड (वय २६, रा. टाकळी रोड, मिरज) अशी असल्याचे निष्पन्न झाले.
झडतीदरम्यान अधीन माळी याच्याकडून चार देशी बनावटीची पिस्तुले व चार जिवंत काडतुसे, तर अमन गोंड याच्याकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले. आरोपींकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे तपासात स्पष्ट झाले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी ही शस्त्रे सूरज जगन्नाथ मोहिते (रा. सोहोली, ता. कडेगाव) व अक्षय पाटील (रा. वाई, जि. सातारा) यांच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. हे दोन्ही संशयित सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित परिट, पोहेकॉ अमोल ऐतवडे, सोमनाथ गुंडे, रोहन घसते तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सहभाग घेतला.
पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणारे, विक्री करणारे तसेच गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या