सांगली, दि. १२ जून : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकरी व आंदोलनकर्त्यांना कोणत्याही प्रकारचा मानसिक, प्रशासकीय अथवा पोलीस यंत्रणेमार्फत त्रास देऊ नये, अशी मागणी शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीचे निमंत्रक अॅड. दीपक लाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शक्तीपीठ महामार्गामुळे प्रभावित होणारे शेतकरी आपल्या शेती, जमीन आणि उपजीविकेच्या संरक्षणासाठी लोकशाही व संविधानिक मार्गाने शांततापूर्ण आंदोलन करीत आहेत. आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावना आणि न्याय्य मागण्यांचा विचार करून प्रशासनाने त्यांच्याशी सहकार्याची भूमिका घ्यावी. आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकरी व कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, याबाबत संबंधित यंत्रणांना स्पष्ट सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच सांगली जिल्ह्यात खून, दरोडे, घरफोडी, अवैध धंदे आणि इतर गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याबाबतही निवेदनात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने अशा गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणीही ॲड. लाड यांनी केली आहे.
शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहून त्यांना न्याय मिळावा आणि आंदोलनकर्त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जाऊ नये, अशी अपेक्षा संघर्ष समितीने व्यक्त केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या