सांगली, दि. 12 : राष्ट्रीय सुरक्षा परिषद आणि केंद्रीय विद्युत प्राधीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने "Engage, Educate & Empower People to Enhance Safety" या घोषवाक्याखाली दि. 26 जून ते 2 जुलै 2026 या कालावधीत देशभर राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने विद्युत व उदवाहन (लिफ्ट) सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार असून नागरिक, शासकीय विभाग आणि विविध संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मा. मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री, मा. अतिरिक्त मुख्य सचिव (ऊर्जा) आणि मा. मुख्य विद्युत निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये हा सप्ताह राबविण्यात येणार आहे. विद्युत निरीक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, विद्युत ठेकेदार तसेच उदवाहन ठेकेदार यांच्या संयुक्त सहभागातून हा उपक्रम यशस्वी करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती अधीक्षक अभियंता हे. ना. गांगुर्डे यांनी दिली.
या सप्ताहाच्या माध्यमातून सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषद, शाळा, महाविद्यालये, विविध शासकीय विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, महापारेषण कंपनी आणि महाजनको यांच्यामार्फत विद्युत सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती केली जाणार आहे. विद्युत कारणांमुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सुरक्षाविषयक उपाययोजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे.
विद्युत सुरक्षा सप्ताहादरम्यान योग्य क्षमतेचा ELCB/RCCB बसविण्याचे महत्त्व, तो कार्यान्वित ठेवण्याची आवश्यकता, वीज संचमांडणीस सक्षम अर्थिंग करणे, अर्थिंगचे महत्त्व, दोन पिन सॉकेटऐवजी तीन पिन सॉकेटचा वापर, तात्पुरत्या व जोडविरहित वायरिंगमुळे निर्माण होणारे धोके याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
याशिवाय लहान मुलांना एकट्याने उदवाहनात प्रवास करू दिल्यास उद्भवू शकणाऱ्या धोक्यांबाबत जनजागृती केली जाणार आहे. उदवाहनातील ओव्हर स्पीड गव्हर्नर, एआरडी (Automatic Rescue Device), तसेच सर्व दरवाज्यांवरील इंटरलॉक प्रणाली योग्य प्रकारे कार्यरत असल्याची खात्री करण्याचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले जाणार आहे. वीज संचमांडणी व उदवाहनाची कामे शासनमान्य ठेकेदारांकडून करून घेतल्यास सुरक्षेची पातळी अधिक वाढते, याबाबतही सप्ताहात विशेष चर्चा आणि जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
दि. 26 जून ते 2 जुलै 2026 या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहात सर्व संबंधित विभाग, यंत्रणा, शैक्षणिक संस्था आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून विद्युत सुरक्षेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन पुणे प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळामार्फत करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या