प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, शाखा तासगाव येथे लोकमंगल परिवाराच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करताना त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देण्याचा हा उपक्रम ठरला.मा.आमदार सुभाष (बापू) देशमुख यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमंगल पतसंस्थेचे संचालक डॉ.प्रा.विठ्ठल ढेकळे हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून तालुका, जिल्हा व राज्य शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ मुख्याध्यापक शंकर वैद्य (गुरुजी) उपस्थित होते.यावेळी अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केवळ गुण मिळवणेच नव्हे, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणासोबत संस्कार, शिस्त,आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम यांची जोड आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर ती पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.कार्यक्रमात दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.तसेच मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या कु.ऐश्वर्या कोळी हिचा विशेष सत्कार करून तिच्या यशाचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशामागे मोलाची भूमिका बजावणाऱ्या पालकांचाही यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला.सत्कारानंतर विद्यार्थी आणि पालकांनी मनोगत व्यक्त करत लोकमंगल परिवाराच्या या प्रेरणादायी उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे असे उपक्रम त्यांच्या आत्मविश्वासात भर घालतात, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, पालक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी, शाखेचे सल्लागार तसेच लोकमंगल परिवाराचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शाखाधिकारी सौ.तोडकर मॅडम यांनी केले, तर गुरव गुरुदत्त यांनी आभार मानले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्याबरोबरच त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी प्रेरणा देणारा हा सोहळा संस्मरणीय ठरला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या