प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :राज्यातील सन 2024 व 2025 मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार तासगाव तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींसाठी सदस्य पदांच्या आरक्षण निश्चितीची सोडत काढण्यासाठी दि. 11 जून व 12 जून 2026 रोजी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रक्रियेत आळते, बोरगाव, दहिवडी, धामणी, ढवळी, धूळगाव, डोंगरसोनी, धोंडेवाडी, डोर्ली, गौरगाव, गव्हाण, गोटेवाडी, हातनोली, हातनूर, जरंडी, जुळेवाडी, कौलगे, कवठेएकंद, लोढे, लोकरेवाडी, मांजर्डे, मोराळे पेड, नागांव कवठे, नरसेवाडी, निंबळक, पाडळी, पेड, राजापूर, सावळज, शिरगाव, सिद्धेवाडी, तुरची, वाघापूर, वज्रचौंडे, विजयनगर, विसापूर, वडगाव, यमगरवाडी आणि येळावी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.विशेष ग्रामसभेमध्ये शासनाच्या प्रचलित नियमांनुसार व मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामपंचायत सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत पारदर्शक पद्धतीने काढण्यात येणार आहे. या प्रक्रियेची माहिती नागरिकांना प्रत्यक्ष मिळावी तसेच आरक्षण निश्चितीची कार्यवाही खुल्या वातावरणात पार पडावी यासाठी ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे.तरी संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिक, लोकप्रतिनिधी, इच्छुक उमेदवार आणि ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेस उपस्थित राहून कार्यवाहीची नोंद घ्यावी, असे आवाहन तहसीलदार अतुल पाटोळे यांनी केले आहे. आरक्षण सोडतीनंतर आगामी ग्रामपंचायत निवडणुकांचे चित्र अधिक स्पष्ट होणार असल्याने तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या