पलूसमध्ये शक्तिपीठ महामार्गाविरोधात एल्गार मोर्चा; बैलगाड्या, ट्रॅक्टरसह हजारो शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक
By -
जून २५, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज | पलूस
शासनाच्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात पलूस शहरात बुधवारी हजारो शेतकरी, महिला व तरुणांनी एकत्र येत भव्य एल्गार मोर्चा काढला. बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि विविध वाहनांसह निघालेल्या या मोर्चाने शहराचे लक्ष वेधून घेतले. मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देत प्रशासनाला निवेदन सादर केले.
शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक ॲड. दीपक लाड आणि हस्तांतरित संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. श्रीधर होनमाने यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. सकाळपासूनच जुळे बसस्थानक परिसरात सांगली जिल्ह्यातील विविध भागांतील शेतकरी, महिला आणि युवक मोठ्या संख्येने जमा झाले होते.
"शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे", "शेतकऱ्यांची जमीन बळजबरीने लाटू नका", "आमची जमीन आमच्या हक्काची" अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. बैलगाड्या आणि ट्रॅक्टरच्या सहभागामुळे आंदोलनाला पारंपरिक व प्रभावी स्वरूप प्राप्त झाले.
यावेळी बोलताना संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गामुळे हजारो एकर सुपीक जमीन बाधित होणार असून अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक व सामाजिक नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे विस्थापन स्वीकारले जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर प्रांत अधिकारी रणजित मोसले यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शक्तिपीठ महामार्गाचा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा तसेच भूसंपादनाची कोणतीही प्रक्रिया पुढे नेऊ नये, अशी प्रमुख मागणी यामध्ये करण्यात आली.
या आंदोलनात बी. जी. पाटील, टी. वाय. पाटील, सुभाष पाटील, दिगंबर कांबळे, अशोकराव महिंद्र, राजेश जाधव, अविनाश काळिंगर, जयराम काटकर, दत्तात्रय जगताप, अशोक निकम, विजय महाडिक, महेश कुपडे, कृष्णा जाधव, रावसाहेब गोवील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सुरू असलेला हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला असून, शासनाने निर्णय न घेतल्यास पुढील काळात जिल्हाभर आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या