वाढीव घरपट्टीविरोधात कृती समिती २९ जूनला सांगली महापालिकेसमोर गांधीगिरी आंदोलन करणार
By -
जून २५, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. २६ : सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेने भांडवली मूल्यावर आधारित लागू केलेल्या वाढीव घरपट्टीविरोधात नागरिकांचा विरोध अधिक तीव्र होत असून, यासंदर्भात स्वामी विवेकानंद ज्येष्ठ नागरिक संघात वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
बैठकीत ज्या नागरिकांना घरपट्टीच्या नोटिसा वेळेत प्राप्त झाल्या नाहीत किंवा विविध कारणांमुळे हरकती दाखल करता आल्या नाहीत, अशा नागरिकांना मुदतवाढ देण्याची मागणी प्रशासनाकडे वारंवार करण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले. मात्र, या मागणीबाबत प्रशासनाकडून केवळ चालढकल सुरू असल्याचा आरोप करत उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी कृती समितीच्या वतीने येत्या २९ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. याच दिवशी महापालिकेची महासभा होणार असल्याने सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना गांधीगिरीच्या मार्गाने निवेदन देऊन नागरिकांच्या भावना व्यक्त करण्यात येणार असल्याचे समितीने जाहीर केले.
बैठकीत नागरिकांना आणखी एक महत्त्वाचे आवाहन करण्यात आले. ज्या नागरिकांच्या हरकती दाखल करण्याची मुदत संपली आहे, त्यांनीही निराश न होता आपली हरकत महानगरपालिका आयुक्त किंवा घरपट्टी विभागाकडे स्पीड पोस्ट अथवा रजिस्टर पोस्टाने पाठवावी. तसेच त्या हरकतीची प्रत वाढीव घरपट्टी विरोधी कृती समिती, १५१४, पंचमुखी मारुती रोड, खानभाग, सांगली या पत्त्यावर पाठवावी, असे सांगण्यात आले. यामुळे पुढील कायदेशीर व सामूहिक लढ्यासाठी आवश्यक नोंदी ठेवता येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले.
या बैठकीस सतीश साखळकर, हनमंतराव पवार, विष्णू बर्वे, डॉ. ज्ञानचंद्र पाटील, रवींद्र वळवडे, बाळासाहेब मासुळे, नितीन मिरजकर यांच्यासह विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
वाढीव घरपट्टीविरोधातील लढा अधिक व्यापक करण्यासाठी नागरिकांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या