शाळांच्या नावांमध्ये दिशाभूल करणारे शब्द वापरण्यावर शासनाची निर्बंधात्मक कारवाई
By -
जून ०२, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
मुंबई: राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या नावांमध्ये विद्यार्थी व पालकांची दिशाभूल करणारे शब्द वापरण्यास महाराष्ट्र शासनाने निर्बंध घातले आहेत. यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.
शासनाच्या निदर्शनास आले आहे की, अनेक खाजगी शाळा त्यांच्या नावांमध्ये "इंटरनॅशनल", "ग्लोबल", "वर्ल्ड", "युनिव्हर्सल", "ऑक्सफर्ड" यांसारख्या शब्दांचा वापर करतात. त्यामुळे संबंधित शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असल्याचा समज पालक व विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतो. मात्र प्रत्यक्षात अशा अनेक शाळा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम किंवा मंडळाशी संलग्न नसतात, त्यामुळे दिशाभूल होण्याची शक्यता वाढते.
नवीन निर्णयानुसार, आयबी (IB) किंवा आयसीएसई (ICSE) यांसारख्या आंतरराष्ट्रीय मंडळांशी संलग्न अथवा संलग्न होऊ इच्छिणाऱ्या शाळांनाच "इंटरनॅशनल", "ग्लोबल", "युनिव्हर्सल", "वर्ल्ड", "युरो" यांसारखे शब्द नावात वापरण्याची परवानगी असेल. राज्य मंडळ, सीबीएसई किंवा इतर राष्ट्रीय मंडळांशी संलग्न शाळांना अशा शब्दांचा वापर करता येणार नाही.
तसेच, "कॉन्व्हेंट" हा शब्द केवळ ख्रिस्ती धर्मसंघ किंवा नन्स समुदायाद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांनाच वापरता येईल. "सैनिकी शाळा" म्हणून मान्यता प्राप्त संस्थांनाच "सैनिकी" शब्द वापरण्याची मुभा राहील. याशिवाय विद्यार्थी, पालक किंवा नागरिकांची दिशाभूल करणारे कोणतेही शब्द शाळांच्या नावात वापरता येणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
हा शासन निर्णय भूतलक्षी प्रभावाने लागू होणार नसून राज्य शासनाकडे येणाऱ्या विविध शैक्षणिक प्रस्तावांवर या तरतुदी लागू राहतील. या निर्णयामुळे शाळांच्या नावांबाबत अधिक पारदर्शकता निर्माण होऊन पालक व विद्यार्थ्यांची दिशाभूल रोखण्यास मदत होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या