सांगली प्रतिनिधी : सत्यशोधक वाचनालय व शांतीनगर व्यायाम मंडळ, सांगली यांच्या वतीने शांतीनगर येथे महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमामध्ये जयंती उत्सवाबरोबरच भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस लेखणीपुत्र व शिवसेना नेते कुलदीप देवकुळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती उत्सवाची सुरुवात करण्यात आली. यावेळी स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे नेते प्रशांतभाऊ सदामते यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले.
यानंतर सत्यशोधक वाचनालय व शांतीनगर व्यायाम मंडळाचे सर्वेसर्वा आकाश तिवडे यांनी वाचनालय व व्यायाम मंडळाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि युवक विकासाच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गजू दादा बन्ने तसेच माजी नगरसेविका शेवंताताई वाघमारे उपस्थित होत्या.
दुसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या भव्य आरोग्य शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते गजू दादा बन्ने यांच्या हस्ते महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या. विशेषतः खणभाग परिसरातील नागरिकांना या शिबिराचा मोठा लाभ झाला.
यावेळी किरणराज कांबळे, तानाजी केंचे, गोविंदा घाडगे, गणेश कांबळे, सचिन केंचे, कुंदन केंचे, विवेक मोहिते, दीपक लोंढे, शुभम मोहिते, कुमार आवळे, इसाक केंचे, विनीत मोरे, ओम मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जितेंद्र हेगडे यांनी केले.
सामाजिक बांधिलकी जपत जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांचे नागरिकांनी स्वागत केले असून आयोजकांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या