सांगली : नूतन बुद्धिबळ मंडळ, सांगली आयोजित ५७ व्या सांगली बुद्धिबळ महोत्सवांतर्गत झालेल्या तिसऱ्या कै. भाऊसाहेब पडसलगीकर स्मृती ऑल इंडिया खुल्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत नागराळेच्या विक्रमादित्य चव्हाणने विजेतेपद पटकावले. तर सांगलीच्या आदित्य खैरमोडेने उपविजेतेपद मिळवले.
स्पर्धेच्या आठव्या आणि अंतिम फेरीत पहिल्या पटावर मिरजेच्या अभिषेक पाटील आणि विक्रमादित्य चव्हाण यांच्यात लढत झाली. या सामन्यात अभिषेकने ३८ व्या चालीत विक्रमादित्यचा पराभव केला. मात्र सात फेऱ्यांअखेर मिळवलेल्या आघाडीमुळे आणि बुकलॉझ गुणांच्या जोरावर विक्रमादित्यने ७ गुणांसह स्पर्धेचे विजेतेपद आणि ४ हजार रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले. अभिषेक पाटील याने ६.५ गुणांसह तिसरे स्थान मिळविले.
दुसऱ्या पटावरील लढतीत सांगलीच्या आदित्य खैरमोडेने जयसिंगपूरच्या अभय भोसलेचा ३८ व्या चालीत पराभव करत ७ गुणांसह उपविजेतेपद आणि ३ हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले. अभय भोसले ६ गुणांसह पाचव्या स्थानावर राहिला.
ईश्वरपूरच्या पार्श्व लिगाडेचा पराभव करत मिरजेच्या मुदस्सर पटेलने ६.५ गुणांसह चौथे स्थान मिळविले. सांगलीच्या ईश्वरी जगदाळेने सदानंद चोथेचा पराभव करून सहावे स्थान पटकावले. तसेच संतोष सरीकर, अर्णव पोर्लेकर आणि सौमित्र केळकर यांनीही प्रत्येकी ६ गुणांसह अनुक्रमे सातवे, आठवे आणि नववे स्थान मिळविले.
स्पर्धेतील अव्वल क्रमवारी पुढीलप्रमाणे : विक्रमादित्य चव्हाण (७), आदित्य खैरमोडे (७), अभिषेक पाटील (६.५), मुदस्सर पटेल (६.५), अभय भोसले (६), ईश्वरी जगदाळे (६), संतोष सरीकर (६), अर्णव पोर्लेकर (६), सौमित्र केळकर (६) आणि दिशा पाटील (५.५).
स्पर्धेत ज्येष्ठ गटात राजू सोनेचा व दिलीप कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला. विविध वयोगटांतील तसेच सांगली जिल्हास्तरीय उत्कृष्ट खेळाडूंनाही पारितोषिके प्रदान करण्यात आली.
स्पर्धेचे पंच म्हणून वरिष्ठ राष्ट्रीय पंच शैलेश व्होनकट्टी (इचलकरंजी), मोहिनीराज डांगे (हातकणंगले) आणि विजय सलगर (इचलकरंजी) यांनी काम पाहिले.
पारितोषिक वितरण समारंभ बलभीम व्यायामशाळेचे राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक ज्ञानेश लिमये आणि राष्ट्रीय मल्लखांब खेळाडू सौ. मधुरा लिमये यांच्या हस्ते पार पडला. यावेळी चिंतामणी लिमये आणि डॉ. उल्हास माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या