सांगली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त सांगली विभागातील २५ वर्षे सलग अपघातमुक्त सेवा देणाऱ्या २१ एसटी चालकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सुरक्षित वाहतुकीची परंपरा जपत प्रवाशांच्या सेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या चालकांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा विभागीय यंत्र अभियंता (चालन) सुकन्या साठे यांनी चालकांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करताना सुरक्षित प्रवास ही एसटीची सर्वात मोठी ओळख असल्याचे सांगितले. प्रवाशांच्या जीविताची जबाबदारी पार पाडताना चालकांनी दाखविलेली शिस्त, संयम आणि दक्षता ही एसटीच्या विश्वासार्हतेची ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी सन्मानित चालकांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि विशेष सेवा बिल्ला प्रदान करण्यात आला. चालकांच्या यशामागील कुटुंबीयांच्या योगदानाची दखल घेत त्यांच्या पत्नींचाही साडी व खण देऊन सन्मान करण्यात आला.
या गौरव सोहळ्यात विभागीय भांडार शाखा, मार्ग तपासणी पथक तसेच मिरज, तासगाव, विटा, जत, आटपाडी आणि शिराळा आगारातील चालकांचा समावेश होता. त्यांच्या प्रदीर्घ अपघातमुक्त सेवेमुळे एसटीच्या सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रतिमेला अधिक बळ मिळाल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास कामगार अधिकारी प्रवीण पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, विभागीय वाहतूक अधीक्षक सतीश पाटील, विभागीय लेखाकार संदीप फोंडे, अंतर्गत लेखा परीक्षक संदीप फारणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.
एसटी सेवेत निष्ठा, जबाबदारी आणि सुरक्षिततेचा आदर्श निर्माण करणाऱ्या या चालकांचा सत्कार सोहळा प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या