प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 2 : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई यांच्या सूचनेनुसार सन 2026 ते 29 साठी दरनिर्धारणास मुदतवाढ देण्यात आली असून, याबाबतची जाहीर सूचना महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने प्रसिद्धी केली आहे. तरी लाभार्थी / उपभोक्त्यांनी त्यांचे मत, अभिप्राय लिंकद्वारे, ई मेलद्वारे तसेच टपालाद्वारे दि. 5 जून रोजी सायं 5 वाजेपर्यंत सादर करावेत., असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अ. प्र. सुर्यवंशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने (मजनिप्रा) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम २००५ चे कलम ११ (घ) व ११ (प) मधील तरतुदीनुसार १ जुलै २०२६ ते ३० जून २०२९ या नियंत्रण कालावधीकरिता ठोक जलप्रशुल्काचे पुनर्विलोकन व पुनरीक्षण करण्याची कार्यवाही सुरु केली असून निवडक तज्ञ समुहाच्या सदस्यांनी केलेल्या अभिप्राय /सूचना विचारात घेवून सुधारित केलेल्या ठोक जलप्रशुल्क निकषाच्या मसुद्यात व प्रारुप जलप्रशुल्क प्रस्तावास प्राधिकरणाने मान्यता दिली आहे.
अधिनियमाच्या कलम ११ (घ) च्या तरतुदीनुसार ठोक जलप्रशुल्क निर्धारण करताना लाभार्थ्यांच्या किंवा उपभोक्त्यांच्या मतांची खात्री करुन घेतल्यानंतर सदर ठोक जलप्रशुल्क ठरविणे अनिवार्य आहे. त्या प्रयोजनार्थ ठोक जलप्रशुल्क निकषाचा सुधारित मसुदा व प्रारुप ठोक जलप्रशुल्काचा प्रस्ताव (मराठी व इंग्रजी भाषामध्ये) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या www.mwrra.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध केला आहे. तसेच सदर प्रारुप मसुद्यांच्या प्रती सिंचन विकास महामंडळ सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये देखील लाभार्थी /उपभोक्त्यांची मते विचारात घेण्यासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. संबंधितांना त्यांचे अभिप्राय/सूचना प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केलेल्या लिंकवर सुध्दा पाठविता येतील.
तरी लाभार्थी / उपभोक्त्यांनी या प्रारुप निकष व प्रारुप जलप्रशुल्क प्रस्तावांचे काळजीपूर्वक अध्ययन करुन त्यावर त्यांचे काही मत असल्यास त्या पृष्ठ्यर्थ आवश्यक कागदपत्रांसह लेखी स्वरुपात ई-मेलव्दारे mwrratariff2629gov@gmail.com या ई-मेलआयडी वर / अथवा mwrra-maharashtra.gov.in या संकेतस्थळावर या प्रयोजनार्थ नमुद लिंक वर दिनांक ०५ जून २०२६ रोजी संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत सादर करावेत. तसेच ज्या लाभार्थी / उपभोक्त्यांना ई-मेलव्दारे/लिंक च्या माध्यमातून त्यांचे मत नोंदविणे शक्य नसेल त्यांना टपालव्दारे खाली नमूद पत्यावर लेखी स्वरुपात आवश्यक कागदपत्रासह दि. ०५ जून २०२६ रोजी संध्याकाळो ५.०० वाजेपर्यंत सादर करावेत, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या