प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संगे तीर्थाटन योजनेला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, आता 40 जणांचा गट तयार झाल्यास तीर्थयात्रेसाठी स्वतंत्र एसटी बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.
या योजनेचा लाभ महिला मंडळे, भजनी मंडळे, बचतगट, ज्येष्ठ नागरिक संघ तसेच विविध सामाजिक संस्थांना घेता येणार आहे. गटाच्या मागणीनुसार इच्छित तीर्थक्षेत्रासाठी स्वतंत्र बस उपलब्ध करून दिली जात असून, प्रवासाचे नियोजनही सोयीस्कर पद्धतीने करता येत आहे.
योजनेअंतर्गत 40 जणांचा गट असल्यास संपूर्ण बस त्या गटासाठी राखीव ठेवण्यात येते. त्यामुळे प्रवासात वेळेची बचत होत असून, सर्व सदस्यांना एकत्रितपणे तीर्थयात्रेचा आनंद घेता येतो. महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या नियमानुसार उपलब्ध असलेल्या सवलतींचाही लाभ या योजनेत मिळत आहे.
एसटी महामंडळाच्या विश्वासार्ह सेवेमुळे राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांना सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासाची सुविधा उपलब्ध होत आहे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी किंवा नोंदणीसाठी भाविकांनी जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या