मिरज : सेवासदन हॉस्पिटल, मिरज येथे सेवासदन कम्युनिटी डेव्हलपमेंट फाउंडेशनचा १२ वा वर्धापन दिन तसेच सन २०२५-२६ च्या वार्षिक अहवाल प्रकाशनाचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि जनकल्याणाच्या कार्याला समर्पित असलेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि “माणसाने माणसाशी माणसासम वागणे” या प्रार्थनेने झाली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. रविकांत पाटील यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या गेल्या बारा वर्षांच्या सामाजिक प्रवासाचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील जनसंपर्क, समाजातील विविध घटकांशी निर्माण झालेला विश्वास तसेच शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि सामाजिक विकास क्षेत्रात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची त्यांनी माहिती दिली.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन २०२५-२६ च्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. संस्थेने वर्षभरात राबविलेल्या विविध प्रकल्प, आरोग्य शिबिरे, शैक्षणिक कार्यक्रम, महिला सक्षमीकरण उपक्रम आणि ग्रामीण विकासाच्या प्रयत्नांचा सविस्तर आढावा अहवालात मांडण्यात आला. वार्षिक अहवालाचे वाचन डॉ. पद्मश्री चौगुले यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते समाजसेवक ईश्वरजी रायण्णावर यांनी ‘सेवा’ या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित केले. “देश हमें देता है सब कुछ, हम भी कुछ देना सीखें” या प्रेरणादायी विचारातून त्यांनी समाजासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करण्याचे आवाहन केले. स्वतःपासून सुरू होणारी सेवा कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी कशी महत्त्वाची ठरते, याचे प्रभावी विवेचन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला सांगली जिल्ह्यातील विविध गावांमधील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे सचिव योगेश पाटील, उपाध्यक्षा डॉ. अमृता दाते, डॉ. साक्षी पाटील, सौरभ पाटील तसेच संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी गोविंद जोशी यांनी आभार मानले. ‘पसायदान’ सादर करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सूत्रसंचालन कु. मीनाक्षी कोळी यांनी केले.
संस्थेच्या आरोग्य मैत्रिणी, सेवासदन हॉस्पिटलचे कर्मचारीवृंद आणि स्वयंसेवक यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या वर्धापन दिन सोहळ्याने उपस्थितांना सेवाभाव, सामाजिक उत्तरदायित्व आणि राष्ट्रनिर्माणाची प्रेरणा दिली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या