प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता 11 वीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून, दुसऱ्या फेरीतील नोंदणी आणि पसंतीक्रम निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्यभरातील 6 लाख 80 हजार 786 विद्यार्थ्यांनी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयांच्या पसंतीक्रमासह प्रवेश अर्ज लॉक केले आहेत. आता 13 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता पहिली महाविद्यालय वाटप (मेरिट/अलॉटमेंट) यादी जाहीर करण्यात येणार आहे.
शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, 5 जूनपासून सुरू झालेल्या दुसऱ्या फेरीतील नोंदणी, अर्जातील दुरुस्ती आणि कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची अंतिम मुदत 9 जून रोजी सायंकाळी 6 वाजता संपली. या प्रक्रियेत राज्यातील 9,549 कनिष्ठ महाविद्यालयांसाठी एकूण 13 लाख 68 हजार 775 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
विभागनिहाय पाहता, मुंबई विभागात सर्वाधिक 1,73,223 विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केले असून, पुणे विभागात 1,18,615 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम निश्चित केले आहेत. त्यानंतर नाशिक विभागात 80,733, छत्रपती संभाजीनगर विभागात 76,328 आणि कोल्हापूर विभागात 66,420 विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केले आहेत.
शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी विद्यार्थी, पालक आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी 13 जूनच्या अलॉटमेंट यादीची नोंद घ्यावी तसेच प्रवेशासंदर्भातील पुढील प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना
पहिली अलॉटमेंट यादी जाहीर झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयाची माहिती, प्रवेश शुल्क भरण्याची मुदत आणि आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबतची माहिती ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमितपणे प्रवेश पोर्टल तपासत राहावे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या