प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका प्रशासनाने नव्या मूल्यांकनाच्या आधारे घरपट्टीत केलेल्या मोठ्या वाढीविरोधात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य, सांगली जिल्ह्याच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. वाढीव घरपट्टीचा निर्णय तात्काळ रद्द न केल्यास व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले असताना महानगरपालिकेने घरपट्टीत तिप्पट वाढ करून नागरिकांवर अन्याय केला आहे. शहरातील रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, स्वच्छता यांसारख्या मूलभूत नागरी सुविधांची अवस्था समाधानकारक नसताना करवाढ लादणे योग्य नसल्याचा आरोप करण्यात आला.
घरपट्टी मूल्यांकन प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून नागरिकांच्या हरकतींकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचाही आरोप संघटनेने केला आहे. तसेच लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक या प्रश्नावर मौन बाळगत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
“जनतेचा पैसा विकासासाठी खर्च व्हायला हवा. सुविधा अपुऱ्या असताना कर मात्र तिप्पट वाढविणे हा सरळसरळ अन्याय आहे,” अशी भूमिका संघटनेने मांडली.
संघटनेने प्रशासनाला इशारा देताना म्हटले आहे की, वाढीव घरपट्टीचा आदेश तात्काळ मागे घ्यावा. अन्यथा सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका बरखास्त करून ग्रामपंचायत स्थापन करण्याच्या मागणीसाठी तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल. याशिवाय कायदेशीर लढाही उभारला जाईल, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.
या वेळी पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, चेतनाताई नागवंशी, संगीताताई शिंदे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, महासचिव अनिल मोरे, उपाध्यक्ष किशोर आढाव, कोषाध्यक्ष हिरामण भगत, मनपा क्षेत्राध्यक्ष युवराज कांबळे, सांगली शहराध्यक्ष विनायक मोरे, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हाध्यक्ष शिवाजी उर्फ पवन वाघमारे, युवा जिल्हाध्यक्ष सुमेध माने, महासचिव नविनकुमार कांबळे, मिरज तालुका उपाध्यक्ष प्रमोद मल्लाडे, मानतेश कांबळे, दीपक कांबळे, शंकर ऐवळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
संघटनेने शेवटी स्पष्ट केले की, “जनतेच्या हक्कासाठीचा लढा सुरूच राहील. अन्यायकारक घरपट्टी वाढ रद्द होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही.”
हेडलाईन:
घरपट्टी वाढीविरोधात वंचित बहुजन कामगार युनियन आक्रमक; वाढ रद्द न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या