सांगली प्रतिनिधी : येथील हि. हा. रा. चिं. पटवर्धन हायस्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी केंद्र शासनाच्या ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानांतर्गत शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत करंज, निलगिरी, अशोक आदी विविध प्रकारच्या वृक्षांची रोपे लावली. लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारत पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञाही केली.
कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे जतन, वृक्षांचे मानवी जीवनातील महत्त्व आणि वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणाची गरज याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना केवळ वृक्षारोपण न करता त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. केदारी रसाळ, उपमुख्याध्यापिका सौ. विनोदिनी मिरजकर, राष्ट्रीय हरितसेना प्रमुख श्री. रामेश्वर कोरे, सहाय्यक शिक्षक श्री. शिरीष पुजारी, श्री. अमोल घोडके यांच्यासह सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी श्री. प्रशांत वरुडे, वनक्षेत्रपाल सौ. कौसल्या भोसले तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक, एन.सी.सी. विद्यार्थी आणि राष्ट्रीय हरितसेना सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या