सांगली प्रतिनिधी : येथील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या नेमगोंडा दादा पाटील नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स चे शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संचालक प्रा नागनाथ दत्तू बनसोडे यांच्या सेवानिवृत्तीचा सोहळा संस्थेच्या स्व. अँड. केशवराव आप्पाजी चौगुले सभागृहात अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन मा. शांतिनाथ कांते होते. सुरवातीला डॉ बाळासाहेब कोटलगी यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.
प्रा. बनसोडे हे आपल्या ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून ३१ मे २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्त त्यांच्यावर प्रेम करणारे हितचिंतक, सहकारी प्राध्यापक, महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी, खेळाडू, प्रशासकीय सेवक आणि मित्रमंडळी यांनी स्नेह मेळावा आणि कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या मा.प्रकाश मनगिरे, मा. रविंद्र बुडूख मा.भीमाशंकर बनसोडे,डॉ. ज्ञानचंद्र पाटील, मा. संजय धारूरकर अप्पर सचिव महसूल विभाग या मान्यवरांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्ष श्री शांतिनाथ कांते यांचा सत्कार प्राचार्य डॉ. बी. व्ही. पाटील यांनी केला .
नेमगोंडा दादा पाटील नाईट कॉलेजच्या वतीने सत्कारमूर्ती प्रा.नागनाथ बनसोडे आणि त्यांच्या सौभाग्यवती चा यथोचित सत्कार अध्यक्ष मा.शांतीनाथ कांते आणि प्राचार्य डॉ. बी. व्ही. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. संस्था, महाविद्यालय, सेवक पतसंस्था यांच्या वतीने बनसोडे दांपत्य आणि कुटुंबातील सदस्य यांचा सन्मान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रात मार्गदर्शक व उच्चपदस्थ खेळाडुचा यथोचित सत्कार या वेळी प्रा. बनसोडे यांच्या पुढाकाराने आणि मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला आणि हा समारंभ अविस्मरणीय करण्यात आला.
या प्रसंगी अनेकांनी शुभेच्छा संदेश पाठवलेले होते,त्यात विशेष उल्लेखनीय असा संदेश त्यांचे गुरुवर्य तामीळनाडू (मदुराई )मधील क्रीडा शिक्षक प्रा. व्ही.तिरुपती यांनी आपल्या लाडक्या विद्यार्थ्याचा उल्लेख ‘राजा’ असा केला, विद्यार्थी दशेपासूनच "राजा" हा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू होता, त्याने खेळा बरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातही विशेष यश संपादन केल्याचे मांडले,क्रीडा क्षेत्रासाठी अत्यंत समर्पित कार्य करीत असल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी विविध वक्त्यांनी प्रा. बनसोडे यांच्या स्वभावाची वैशिष्ठे आणि विविध गुणांवर प्रकाश टाकला. यात प्रामुख्याने मा. प्रकाश मनगिरे माजी शारीरिक शिक्षण शिक्षक बार्शी यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा उल्लेख केला.प्रसिद्ध उद्योजक मा. रविंद्र बुडूख यांनी बनसोडे सरांना विद्यार्थी दशेपासूनच मदतीचा हात पुढे करून सातत्याने मोलाचे सहकार्य केले असल्याची भावना व्यक्त केली. प्रा.बनसोडे सरांचे काका भीमाशंकर बनसोडे यांनी आपल्या पुतण्या विषयी गौरव उद्गार काढले. खास गोव्याहून आलेले प्रा. मनोज हेदे, करे लॉ कॉलेज मडगाव यांनी हा ‘राजा’ खरोखरच माझ्या जीवाभावाचा मित्र असल्याचे मत मांडले. या शिवाय प्रा. सुधीर वाटवे, डॉ.बाबासो सरगर,डॉ.लीना पाटील यांचा समावेश होता. यावेळी प्रा बनसोडे यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग दाखविणारी चित्रफित सर्व उपस्थितांना दाखविण्यात आली.त्यानंतर प्रा बनसोडे यांनी आपल्या भावना प्रगट करून आपली कौटुंबिक परिस्थिती आणि जीवनप्रवास यावर भावनिक भाष्य केले .जीवनात खेळाडू आणि विद्यार्थी हे माझे प्राण आहेत त्यांच्या हितासाठीच आणि विधायक कामासाठीच मी माझी शक्ती पणाला लावली त्यामुळे सेवानिवृत्तीच्या या क्षणी मी आनंदी आणि कृतार्थ आहे असे मत मांडले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मा. कांते यांनी प्रा बनसोडे यांनी विद्यार्थी आणि खेळाडू घडविण्यासाठी घेतलेले कष्ट उल्लेखनीय असून सेवा निवृत्ती नंतरही त्यांनी क्रीडा क्षेत्रात योगदान द्यावे असे सांगून त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांना उज्ज्वल भविष्य, आणि चांगल्या आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या
या समारंभाला प्रा बनसोडे यांच्यावर प्रेम करणारे त्यांच्या बार्शी या शहरातील त्यांचे शिक्षक, जुने मित्र, त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झालेले त्यांचे आजी, आणि माजी विद्यार्थी, मित्रमंडळी, विद्यापीठ पदाधिकारी, पत्रकार, स्नेही, कुटुंबीय, इतर महाविद्यालयातील त्यांचे सहकारी प्राध्यापक असे सुमारे ४०० ते ५०० लोक उपस्थित होते. सेवानिवृत्तीच्या निमित्ताने संस्थेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रा बनसोडे यांनी ७५ हजार रुपयाचा देणगीचा धनादेश यावेळी चेअरमन श्री शांतिनाथ कांते यांचेकडे सुपूर्द केला .शेवटी महाविद्यालयाच्या सत्कार समितीचे निमंत्रक डॉ राजू सावंत यांच्या आभार प्रदर्शनाने या समारंभाची सांगता झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे प प्रा.जहांगीर ताबोळी, प्रा.किशोर चंदूरे, डॉ.एस.डी.पाटील, प्रा. गणेश सिंहासने, डॉ.महादेव सूर्यवंशी, श्री.शिवाजी घोरपडे, श्री. अविनाश गव्हाणे श्री. सुनील कवठेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या