सांगली प्रतिनिधी : नूतन बुध्दिबळ मंडळ आयोजित ५७ व्या कै. भाऊसाहेब पडसलगीकर स्मृती सांगली बुद्धिबळ महोत्सवांतर्गत झालेल्या १९ व्या कै. श्रीमंत बाळासाहेब लागू स्मृती ऑल इंडिया खुल्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत सांगलीच्या ईश्वरी जगदाळे हिने विजेतेपद पटकावत स्पर्धेवर आपले नाव कोरले. तर सांगलीच्या विक्रमादित्य चव्हाण याने उपविजेतेपद मिळविले.
स्पर्धेच्या सातव्या फेरीत जयसिंगपूरच्या अभय भोसले आणि सांगलीच्या ईश्वरी जगदाळे यांच्यातील डाव अत्यंत चुरशीचा झाला. अभयने रचलेल्या चालींना ईश्वरीने समर्थ प्रत्युत्तर देत २५ व्या चालीला डाव बरोबरीत सोडवला. या अर्ध्या गुणासह ईश्वरीने ६.५ गुणांची कमाई करत रु. ४ हजारांचे रोख पारितोषिक व कै. बाळासाहेब लागू चषक पटकाविला. अभय भोसले याने ५.५ गुणांसह चौथे स्थान मिळवित रु. १ हजारांचे पारितोषिक मिळविले.
दुसऱ्या महत्त्वाच्या सामन्यात सांगलीच्या विक्रमादित्य चव्हाण याने मिरजेच्या मुदस्सर पटेलचा ३४ व्या चालीला पराभव करत ६ गुणांसह उपविजेतेपद पटकाविले. त्याला रु. ३ हजारांचे रोख पारितोषिक देण्यात आले. मुदस्सर पटेलला ५ गुणांसह आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
सांगलीच्या कश्यप खाकंरिया व कोल्हापूरच्या सोहम खासबारदार यांच्यातील डाव बरोबरीत सुटला. या निकालामुळे सोहम खासबारदार याने ५.५ गुणांसह तिसरे स्थान मिळवत रु. २ हजारांचे पारितोषिक पटकाविले. कश्यप खाकंरिया याने ५ गुणांसह सहावे स्थान मिळविले.
पृथ्वीराज पाटील याने कोल्हापूरच्या सर्वेश पोतदारचा ३२ व्या चालीला पराभव करत ५.५ गुणांसह पाचवे स्थान मिळविले. तसेच कोल्हापूरच्या सोहम चाळकेने अशोक मानेचा पराभव करून सातवे स्थान मिळविले.
स्पर्धेत गोपाळ राठोड, तन्मय पवार, आदित्य आळतेकर, सम्मेद पाटील, पार्श्व लिगाडे, सदानंद चोथे आणि शार्विल येडेकर यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली.
स्पर्धेतील विविध वयोगटांतील उत्कृष्ट खेळाडूंनाही पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ गटात दिलीप कुलकर्णी व सुरेश कुमारमठ यांचा गौरव करण्यात आला.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ प्रख्यात केटरर्स मा. अजय मण्णूर व सौ. आदिश्री मण्णूर यांच्या हस्ते, चिंतामणी लिमये यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. स्पर्धेचे पंच म्हणून सिनिअर राष्ट्रीय पंच शैलेश व्होनकट्टी, मोहिनीराज डांगे आणि विजय सलगर यांनी काम पाहिले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या