प्रतिष्ठा न्यूज
कुंडल प्रतिनिधी : पलूस-कडेगाव शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या नेवरी ते घोगाव आत्मक्लेश पायी पदयात्रेला आज कुंभारगाव येथे महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कुंभारगावातील महिला भगिनींनी जिजाऊंच्या धैर्याने व रणरागिनींच्या निर्धाराने पदयात्रेची धुरा स्वतःच्या हातात घेत शासनाविरोधात तीव्र एल्गार पुकारला.
“रक्त देऊ पण जमीन देणार नाही” अशा निर्धारपूर्ण घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. महिलांनी हातात मशाली घेत शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकरी, कष्टकरी, महिला आणि भावी पिढीचे मोठे नुकसान होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी धोंडीराम जमदाडे यांनी आपल्या धडाकेबाज भाषणातून शासनाच्या धोरणांवर जोरदार टीका करत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.
ॲड. दीपकदादा लाड यांनी शेतकऱ्यांचे हक्क, जमीन आणि भविष्यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन करत प्रभावी मार्गदर्शन केले.
पत्रकार श्रीदास होनमाने यांनी शक्तीपीठ महामार्गामुळे होणारे विविध तोटे, शेतीचे नुकसान, पर्यावरणावर होणारे परिणाम आणि ग्रामीण जनजीवनावर होणारा विपरीत परिणाम याबाबत सविस्तर माहिती देत उपस्थितांना जागृत केले.
कुंभारगावातील महिलांच्या आक्रमक सहभागामुळे आंदोलनाला नवे बळ मिळाले असून, शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी गावागावांतून जनआक्रोश वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या