सांगली प्रतिनिधी : शेतकऱ्यांना विशेषता द्राक्ष बागातदारांना अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचे टाळण्यासाठी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हवामान केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संगणमत करून पावसाच्या नोंदी बदलल्याचे दिसत आहे. शासनाने नेमलेल्या कंपनीचे पर्जन्यमापक केंद्र आणि शेतकऱ्यांनी बसवलेले खाजगी पर्जन्यमापक केंद्र यातील नोंदीमध्ये प्रचंड तफावत बाहेर आलेली आहे. सांगली जिल्ह्या बरोबर राज्यभरातील संबंधित हवामान केंद्रांची चौकशी करून अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी तसेच शेतकऱ्यांना लगेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी, अशी मागणी माजी खासदार संजयकाका पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. दोन वर्षांपूर्वी तालुक्यातील अर्जुन पाटील या जिल्हा परिषद सदस्याने शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई मिळवून देतो म्हणून रक्कम गोळा केली आणि त्यातून चार चाकी घेतली असा आरोप संजय काका यांनी केला.
यावेळी, पंचायत समिती सदस्य महेश पाटील, नितीन पाटील, संदीप पाटील, अमित पवार उपस्थित होते.
संजयकाका पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील विसापूर व येळावी येथील हवामान केंद्राच्या डेटामध्ये संशयास्पद तफावत आढळून आलेबद्दल तपास करणे तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व ठिकाणच्या हवामान केंद्रातील अहवालाची सविस्तर तपासणी झाली पाहिजे. याबाबतचे निवेदन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे दिले आहे.
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील विसापूर व येळावी येथे बुधवार, दि.२२ एप्रिल २०२६ रोजी अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. सदर अवकाळी पावसाची नोंद ही स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा.लि. या खाजगी कंपनीच्या हवामान केंद्रामध्ये डेटा स्वरुपात नोंद करण्यात आली होती. सदर हवामान केंद्रातून कृषी विभाग, सांगली यांना प्राप्त झालेल्या डेटानूसार मोठ्या प्रमाणात तफावत झालेचे दिसून येत आहे. सदर प्राप्त डेटानूसार दि.२२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.१६ वाजता तयार झालेल्या रिपोर्टमध्ये तालुक्यातील अवकाळी पावसाची नोंद २१.०६ अशी झाली असून विसापूर करिता ही नोंद ५९.८ आणि येळावी करिता ५९.८ अशी नोंद झालेली आहे. याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट कृषी विभाग, सांगलीकडे प्राप्त झालेला आहे. परंतु सदर कंपनीच्या हवामान केंद्रातून दि.५ मे २०२६ रोजी सायंकाळी ४.५९ वाजता प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार विसापूर करिता ३८.३ व येळावी करिता ४०.३ असा अहवाल कृषी विभाग, सांगलीकडे प्राप्त झालेला आहे. हे दोन्ही अहवाल तपासले असता एकाच दिवशी म्हणजे दि.२२ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या अवकाळी पावसाच्या दोन वेगवेगळ्या नोंदीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळलेली असून याबद्दल संशय निर्माण झालेला आहे. सदर दोन वेगवेगळ्या अहवालांपैकी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना सन २०२५-२६ अंतर्गत विमा कंपन्यांकडून कमी आकडेवारी असणाऱ्या अवकाळी पावसाची नोंद विमा कंपन्यांकडून ग्राह्य धरली गेल्यास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा होणार आहे. तसेच स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ यांच्या सांगण्यानूसार काही राजकीय लोकांकडून या अवकाळी पावसाच्या अहवालात जाणून-बुजून तफावती केलेच्या तक्रारी करण्यात येत आहेत. याबद्दल वरील खाजगी कंपनीची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व ठिकाणच्या अवकाळी पावसाच्या अहवालासंदर्भातही अशी संशयास्पद तफावत आढळून आलेची दिसून येते. यापूर्वीच्या अवकाळी पावसाच्या नोंदीमध्येही तफावत असणेची शक्यता नाकारता येत नाही, त्याबद्दल सविस्तर तपासणी होवून सदर कंपनीचे यापुर्वीचे ही सर्व अहवाल राज्य शासनामार्फत तपासणे आवश्यक आहे.
सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील विसापूर व येळावी येथील स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा.लि. या खाजगी कंपनीच्या हवामान केंद्राच्या डेटामध्ये संशयास्पद तफावत आढळून आलेबद्दल तपास करणे तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व ठिकाणच्या हवामान केंद्रातील अहवालाची सविस्तर तपासणी होणेकरिता आपणाकडून संबंधिताना योग्य ते आदेश झाले पाहिजेत.
शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये तसेच झाल्यास आम्ही खपवून घेणार नाही विमा कंपन्यांच्या अधिकारी व त्यांना सहकार्य करणारे हवामान केंद्रातील कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील यांनी त्यावेळी काळी मुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळवून देण्याचे अमिष दाखवून शेतकऱ्यांकडून पैसे गोळा केले होते. हे पैसे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी वरती द्यायचे आहेत असे त्यांनी सांगितले होते. परंतु या पैशातूनच त्यांनी स्वतःसाठी चार चाकी प्रदान करण्याचा कार्यक्रम घेतला. उर्वरित पैशाचे काय झाले याबाबत काही समजले नाही. शेतकऱ्यांना लुटण्याचा धंदा काही लोक करत आहेत. त्यांच्यापासून शेतकऱ्यांनी सावध राहिले पाहिजे. असे आवाहन माजी खासदार संजय काका पाटील यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या