प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्रीमंतीबाई कळंत्रे आक्का प्राथमिक विद्यामंदिर येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आनंद, उत्साह आणि भावनिक वातावरणात पार पडला. शाळेच्या प्रांगणात पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळत बालपणाच्या आठवणी ताज्या झाल्या.
कार्यक्रमासाठी सकाळी ९ वाजल्यापासून माजी विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू झाली. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनींनी पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत लेझीम व ढोल-ताशांच्या गजरात प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे जल्लोषात स्वागत केले. यामुळे शाळेचा परिसर जुन्या आठवणींनी भारावून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरणपूरक ‘वृक्षजलार्घ्य’ या उपक्रमाने करण्यात आली. यामधून निसर्गप्रेम व सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. प्रास्ताविकात माजी विद्यार्थी मेळाव्याचे अध्यक्ष गौतम पाटील यांनी शाळेच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेत मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. पाहुण्यांचा परिचय अविनाश उपाध्ये यांनी करून दिला.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रसिद्ध ग्रामीण कथाकार प्रा. विश्वनाथ गायकवाड यांनी आपल्या विनोदी शैलीत व हृदयस्पर्शी कथांमधून उपस्थितांचे मनोरंजन करत जीवनमूल्यांचा संदेश दिला.
यावेळी कोणार्क पाटील, शिवराज शिंदे, सागर चौगुले, इरन्ना वज्रवाड, मुजफ्फर मुजावर, माधुरी मेहता व तेजश्री चव्हाण यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा देत मनोगते व्यक्त केली. काहींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तर काहींच्या चेहऱ्यावर हसरे क्षण झळकत होते. शिक्षकांनीही आपल्या आठवणी सांगत गुरु-शिष्य नात्याची घट्ट बांधणी पुन्हा अनुभवली. यामध्ये श्रीमती सुनंदा पाटील व सौ. देवयानी कवठेकर यांनी मनोगते व्यक्त केली.
स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने अनेक माजी विद्यार्थी वर्षानुवर्षांनी एकत्र आले. गप्पा, हास्य, सेल्फी आणि छायाचित्रांमधून सर्वांनी या क्षणांचा मनमुराद आनंद घेतला.
या कार्यक्रमास शाळा समितीचे चेअरमन राहुल पाटील, सदस्या सुनिता उपाध्याय, मुख्याध्यापक शांतीनाथ चौगुले, माजी मुख्याध्यापक एन. एन. तांबोळी, प्रॅक्टिसिंग स्कूलचे मुख्याध्यापक अमर पाटील तसेच सेवानिवृत्त शिक्षक श्रीमती हौशा वांजुळे, कु. अवंतिका चव्हाण, श्रीमती क्षमा भोरे यांसह सर्व विद्यमान व माजी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. सुमारे १५० माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.
कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि माजी विद्यार्थी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे केले. सूत्रसंचालन सौ. सुनिता सावंत व मनिषा मगदूम-चौगुले यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. शोभा हुलिकीरे यांनी केले.
हा स्नेहमेळावा केवळ एक कार्यक्रम न ठरता, जुन्या नात्यांना नव्याने उजाळा देणारा आणि आयुष्यभर स्मरणात राहील असा अविस्मरणीय सोहळा ठरला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या