प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” अंतर्गत तासगाव तालुक्यात राबविण्यात आलेल्या विकासकामांची आता कसून चाचपणी सुरू झाली असून, धाराशिव जिल्ह्यातील लोहारा पंचायत समितीचे मूल्यमापन पथक तासगावमध्ये दाखल झाले आहे. या पथकाकडून वर्षभरातील कामकाजाची ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष पाहणी करत सखोल पडताळणी केली जाणार आहे.
दि. १७ सप्टेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या अभियानात तासगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींनी उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे, सुमारे २० टक्के ग्रामपंचायतींनी पुढाकार घेत विविध विकासात्मक उपक्रम प्रभावीपणे राबवत तालुक्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे.अंजनी, वडगाव, दहिवडी, बलगवडे, पाडळी, विजयनगर, धामणी, शिरगाव, निमणी, धुळगाव, उपळवी, बेंद्री, योगेवाडी आणि नागाव-कवठे या ग्रामपंचायतींनी अभियानातील आठही घटकांवर उत्कृष्ट कामगिरी करत आदर्श निर्माण केला आहे.
या अभियानात सुशासनयुक्त गाव, जलसमृद्धी, स्वच्छता व हरित उपक्रम, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, संस्थात्मक सक्षमीकरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय व लोकसहभाग, तसेच श्रमदान आणि नावीन्यपूर्ण उपक्रम या विविध अंगांनी सर्वांगीण विकास साधण्यात आला आहे.मूल्यमापनासाठी आलेल्या पथकात गटविकास अधिकारी जे. टी. वगगे, विस्तार अधिकारी एस. एम. सिनगार, ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय वाघमारे, पंचायत समिती सदस्य भीमाशंकर डोकडे, रामदास बोयगे आणि सौरभ जगताप यांचा समावेश आहे. पथकाकडून कामांची प्रत्यक्ष पाहणी होत असल्याने ग्रामपंचायतींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
दरम्यान, अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रभारी गटविकास अधिकारी अविनाश पाटील यांनी उल्लेखनीय समन्वय साधत कामगिरी बजावली. त्यांच्या कार्याची दखल घेत जिल्हा परिषदेने सादरीकरणासाठी त्यांची पुनर्नियुक्ती केली आहे, ही बाब तासगावसाठी अभिमानास्पद मानली जात आहे.
आगामी सादरीकरणासाठी सभापती अरुणा पाटील, उपसभापती सुखदेव (आबा) पाटील, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, गटविकास अधिकारी शेखर भिलारे, शंकर गावडे, विस्तार अधिकारी तसेच सर्व विभागप्रमुख आणि कर्मचारी सज्ज झाले आहेत. निवडक ग्रामपंचायतींच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण जिल्हा व राज्यस्तरावर होणार असून, तासगाव तालुका राज्यपातळीवर ठसा उमटविण्याच्या तयारीत आहे.
— तासगावच्या विकासकामांची ही चाचणी, राज्यात मानांकन मिळविण्याची मोठी संधी ठरणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या